चिपळूणमधील राड्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया पुणे Bhaskar Jadhav VS Nilesh Rane : कोकणात आज (16 फेब्रुवारी) चांगलाच राजकीय शिमगा पहायला मिळाला. यावेळी ठाकरे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली. भाजपा नेते निलेश राणे यांची आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या निमित्तानं ते चिपळूणमध्ये आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये जोरदार दगडफेक झाली. या मुद्द्यावरुन आता राजकीय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावरुन टीका केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : यासंदर्भात पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यामध्ये भ्याड हल्ले करून कोणीही कुणाला बंदी घालू शकत नाही. घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. तसंच आम्ही या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करू," असंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया :तसंच या प्रकरणी प्रतिक्रिया देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रथमदर्शनी भास्कर जाधव बोलल्यामुळेच हा सगळा गोंधळ झाल्याचा दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना सांगितलं पाहिजे. अशा घटनांचं समर्थन होणार नाही. याची माहिती घेऊन नक्की कारवाई केली जाईल. तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी बोलून सुरुवात करतात. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी त्यांनादेखील समज द्यावी. जर त्यांनी संजय राऊतांना समज दिली तरंच मी निलेश राणेंना समज देईल. ते अगोदर बोलतात म्हणून आम्हाला बोलावं लागतं. त्याच पद्धतीनं अगोदर भास्कर जाधव बोलले. त्यामुळे हा सगळा प्रकार झाला", असं बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -
- राणे समर्थक आणि ठाकरे गटातील राड्यानंतर भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ
- चिपळूणमध्ये राणे समर्थक आणि शिवसेना उबाठा गटात तुफान राडा; पाहा व्हिडिओ
- 'राजकीय स्टेटमेंट करू नका', मनोज जरांगेंना नितेश राणेंचा सल्ला, नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यावर केली सारवासारव