सातारा - अहमदाबादमधील वस्त्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॅव्हेलियन मॉल परिसरात खंडणीसाठी नंग्या तलवारी नाचवत दहशत निर्माण करून दहा ते बारा जण पळून गेले होते. त्यातील पाच जणांना ट्रॅव्हल्समधून कोल्हापूरहून मुंबईकडे जाताना सातारा पोलिसांनी पकडलं.
महामार्गावर पोलिसांनी केली नाकाबंदी- अहमदाबादमध्ये खंडणीसाठी दहशत माजवून पसार झालेले आरोपी हे कोल्हापूरमधून ट्रॅव्हल्सने मुंबईला निघाल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांना रविवारी (१२ जानेवारी) रात्री दिली. तसेच दोन संशयितांचे फोटोही पाठवून पुणे-बंगळुरू महामार्गावर नाकाबंदी करण्यास सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदी करुन ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू केली.
माहिती मिळाली दोघांची, सापडले पाच जण- नाकाबंदीत एका ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची तपासणी सुरू असताना दोन संशयित सापडले. त्याचवेळी आणखी तीन संशयितांनी ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडलं. मिहीर बल्लदेवभाई देसाई (वय २२), प्रिन्स बजरंगलाल जागीड (वय २३), पवन कनुभाई ठाकूर (वय २५), कैलास कमुरचंद दरजी (वय ३४) आणि जिग्रेशभाई अमृतभाई रबारी (वय २६, सर्व रा. अहमदाबाद), अशी संशयितांची नावे आहेत.
गोव्यात फिरून कोल्हापूरमार्गे निघाले होते मुंबईला- अहमदाबादमधील वस्त्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॅव्हेलियन मॉल परिसरात दहा ते बारा जणांनी विजय भरवाड यांच्याशी भांडण केलं. त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी तलवारी नाचवत दहशत निर्माण केली. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ते पळून गेले. याप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचचं पथक आरोपींचा शोध घेत होतं. हे आरोपी दिल्ली मार्गे गोव्याला गेले. त्यानंतर कोल्हापुरात आले. कोल्हापुरातून ते मुंबईकडे जात असताना सातारा पोलिसांनी त्यांना पकडून वस्त्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पुणे सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी-सातारा पोलिसांपाठोपाठ पुणे सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दिसून आली आहे. पुण्यातील इन्स्टंट लोन वसुली एजंट्सकडून सायबर ब्लॅकमेलिंग आणि छळाचे दोन प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणात कर्जदारांचे आत्महत्येचे प्रयत्न सायबर पोलिसांनी रोखले आहेत. २८०० रुपयांचे कर्ज फेडूनही २२ वर्षीय तरुणाच्या कुटुंबातील महिलांचे नग्न फोटो वसुली एजंटनं त्याच्या व्हॉट्सअपवर पाठविले होते. यावर त्रासून गेलेल्या पीडित तरुणानं सायबर हेल्पलाईन १४४०७ वर फोन करून जीवन संपविणार असल्याचं सांगितलं. या तरुणाचं समुपदेशन करण्यात आल्याची माहिती सायबर पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा-