दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील वरवंड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष (शरदचंद्र पवार) शरद पवार यांनी 'लाडकी बहीण योजने'वरुन पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले शरद पवार? : यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले, "सत्ताधारी एका बाजूला लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडं त्या बहिणीची अवस्था काय? भाजपावाले लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात, परंतु 67,381 महिलांवर महाराष्ट्रात अत्याचार झालेत. महाराष्ट्रात बेपत्ता झालेल्या महिलांचा आकडा 64000 आहे. त्यांचा पत्ता लागत नाही. महिलांची राज्यात आज अशी अवस्था झालीय. त्यामुळं ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना लाडकी बहीण म्हणण्याचा अधिकारी नाही."
हे राज्य नेमकं कोणासाठी चालू? : "पिकांना बाजारभाव नसल्यानं शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. शेतकऱ्यांची 71 हजार कोटींची कर्जमाफी मी केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ उद्योगपतींची कर्जमाफी केली. महाराष्ट्रामध्ये 20 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महिलांवरील गुन्हे वाढत आहेत, तरुण बेरोजगार आहेत. मग हे राज्य नेमकं कोणासाठी चालू आहे?", असा सवाल पवारांनी केला.
भीमा पाटस पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा करू : पुढं शरद पवार म्हणाले, "एकेकाळी रमेश थोरात भीमा पाटसवर होते, तेव्हा कारखाना चांगला चालत होता. परंतु, आता आमच्या शेतकऱ्यांच्या कारखान्याची मालकी गेलीय. याचं वाईट वाटतं. रमेश थोरात यांना निवडून द्या, भीमा पाटसचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. ही संस्था शेतकऱ्यांची कशी राहील यासाठी प्रयत्न करु", असं आश्वासन यावेळी शरद पवारांनी दिलं.
हेही वाचा -
- 'लाडकी बहीण योजना' आणली, पण 850 पेक्षा अधिक मुली गायब झाल्यात त्याचं काय", शरद पवार यांचा टोला
- शरद पवारांनी भर पावसात घेतली सभा; म्हणाले, "माझा अन् पावसाचा..."
- "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी"; विखेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची फटकेबाजी