मुंबई Uddhav Thackeray : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आणि याच कारणाने शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) फार नाराज झाले. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनीही प्रयत्न केले होते. परंतु मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं जयंत पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा होती. अशात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता, अशी चर्चा आता समोर आलीय.
उद्धव ठाकरेंनी पवारांचा फोन घेतला नाही? : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात जयंत पाटील यांनी प्रचार केल्याचा उद्धव ठाकरे यांना संशय आहे. म्हणून त्यांनी जयंत पाटील यांच्या उमेदवारीस विरोध केला होता. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक वेळा फोन केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्या फोनला उत्तर दिलं नाही अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.
काँग्रेसच्या कुठल्या आमदाराने पाठिंबा द्यायचा यावरून वाद : मिलिंद नार्वेकर यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून ज्या आमदारांचा पाठिंबा भेटण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता. त्यामध्ये हिरामण खोसकर, मोहनराव हंबर्डे, सुलभा खोडके, शिरीष चौधरी आणि कुणाल पाटील या काँग्रेसच्या आमदारांच्या नावांचा समावेश होता. परंतु या आमदारांची मतं फुटतील अशी भीती उद्धव ठाकरे यांना होती. तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गट पुरस्कृत तसेच शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये सुद्धा दोन गट पडले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे शेकाप उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मत देण्याच्या भूमिकेत होते. यामुळं मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला होता.