पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बिटकॉइन घोटाळ्यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला. रवींद्रनाथ पाटील यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान, यावर खासदार सुळे यांनी सोशल मीडियात पोस्ट करून मंगळवारी संध्याकाळी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत रवींद्रनाथ पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत. त्या म्हणाल्या, "मतदानाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचे आरोप करणं नेहमीचं झालंय. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारची खोटी माहिती पसरवली जात आहे. बिटकॉइन गैरव्यवहाराच्या खोट्या आरोपांविरुद्ध आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग तसंच सायबर गुन्हे विभागाकडं फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामागील हेतू आणि दुष्प्रवृत्ती पूर्णपणे स्पष्ट आहेत. भारतीय राज्यघटनेनं मार्गदर्शन केलेल्या सक्षम लोकशाहीमध्ये अशा घडत आहे. याचा निषेध करणं योग्य आहे", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण? : पुण्यातील कथित क्रिप्टो फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेल्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी मंगळवारी (19 नोव्हेंबर) धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले की, “2018 मध्ये माझी कंपनी KPMG बिटकॉइन क्रिप्टो चलन घोटाळ्यात फॉरेन्सिक ऑडिटसाठी नियुक्त करण्यात आली होती. परंतु, 2022 मध्ये मला त्या प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मी 14 महिने तुरुंगात होतो. त्या काळात मी विचार करत होतो. मला का अडकवलं गेलंय. मात्र, आमच्याविरुद्ध साक्ष देणारा गौरव मेहता मागील दोन दिवसांपासून माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी मी फोन घेतला. तेव्हा त्यानं 2018 मधील अमित भारद्वाजच्या अटकेचा उल्लेख केला. त्यावेळी अमितच्या ताब्यात असलेले क्रिप्टोकरन्सी हार्डवेअर वॉलेट बदलण्यात आले होते. हे काम पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता आणि त्यांच्या पथकाने केले, असं त्यानं मला सांगितलं. तसंच या प्रकरणात माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आल्याचा दावा मेहतानं केला. खरे गुन्हेगार अमिताभ गुप्ता आणि त्यांची टीम आहे." तर या घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचाही सहभाग असल्याचा दावा रवींद्रनाथ पाटील यांनी केलाय. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार केल्याचंही ते म्हणालेत.