पुणे : विद्येच्या माहेरघरात गेल्या काही महिन्यांपासून विविध गुन्ह्यात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील वाघोली इथल्या वाघेश्वर नगर भागात मध्यरात्री प्रेम प्रकरणातून मुलीच्या पित्यानं आणि भावांनी मिळून अल्पवयीन तरुणाचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. लोखंडी रॉड आणि दगडानं या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्यानं पोलीसही चक्रावले आहेत. गणेश तांडे (17) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर, सुधीर पेटकर आणि लक्ष्मण पेटकर यांना अटक केली आहे.
प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून : याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी लक्ष्मण पेटकर यांच्या मुलीसोबत मृत गणेश तांडे याची मैत्री होती. गणेश आणि मुलगी हे दोघं नियमितपणे बोलत देखील होते. मात्र त्यांचा हा संबंध लक्ष्मण पेटकर आणि त्याच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. बुधवारी मध्यरात्री तक्रारदार यांचा मुलगा गणेश हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून वाघेश्वर नगर गोरे वस्ती वाघोली येथील राहते घरी येताना आरोपी यांनी गणेश याला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यानं मारहाण केली. यावेळी आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगड डोक्यात मारून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे पुढील तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. मुलीशी बोलत असल्यानं प्रेम संबंधाच्या संशयातून या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्यानं परिसरात मोठी दहशत पसरली आहे. वाघोली पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
हेही वाचा :