मुंबई Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. सोमवारपासून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय. सरकारनं मराठा आरक्षणावर एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं होतं. यात १० टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचं विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलंय. यानंतर आता मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाल्यामुळं त्याचा फायदा मराठा समाजाला होणार आहे.
नोकर भरतीसाठी आरक्षण लागू : मराठा आरक्षण अंमलबजावणीबाबत शासन निर्णयाचं राजपत्र जारी करण्यात आलंय. या व्यतिरिक्त बिंदू नामावलीही जाहीर करण्यात आलीय. मराठा आरक्षण विधेयक विधान भवनात मंजूर करण्यात आल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय. मात्र यापूर्वी ज्या सरकारी नोकर भरती झाल्या आहेत, त्यासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. मात्र, 26 फेब्रुवारीनंतर होणाऱ्या भरती प्रक्रियेला हे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळं आता मराठा समाजातील मुला-मुलींना नोकर भरतीसाठी आणि शैक्षणिक सवलतीसाठी १० टक्के आरक्षण मिळणार आहे.
आरक्षणाचा फायदा समाजाला होईल: मराठा आरक्षणाचा जीआर निघाला आहे. या आरक्षणामुळं मराठा समाजातील वंचित घटकांना न्याय मिळेल, याचा फायदा मराठा तरुण आणि तरुणींना होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं मला समाधान आहे. ‘मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की, मराठा समाजाला आरक्षण देईन आणि ते मी पूर्ण केल्यामुळं आनंद होत आहे', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय.