मुंबई Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले. काही ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते, तर काही ठिकाणी प्रचार यात्रा काढण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांचा मुंबईत प्रचार दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मुंबईत प्रचार दौरा काढला. त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या प्रचार यात्रेत भाग घेतला. तर त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या प्रचाराच्या विकास रथावर उभे राहून त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. वीस तारखेनंतर आपण दिवाळी साजरी करणार असून आपले राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव हे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
ही निवडणूक संपूर्ण देशाची : पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज प्रचाराचा शेवटचा दिवस असला तरी सर्व कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच सोमवारी मतदाना दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. जास्तीत जास्त मतदान करून आपले उमेदवार निवडून येतील याची काळजी घ्या. ही निवडणूक केवळ मुंबईची किंवा महाराष्ट्राची नसून ही संपूर्ण देशाची आणि विकासाची निवडणूक आहे असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री प्रचारात सहभागी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव सहभागी झाले होते. राहुल शेवाळे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी या प्रचार यात्रेदरम्यान केलं.