मुंबई CM Eknath Shinde Exclusive Interview :राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झालं असून, आता सर्वांचं लक्ष 4 जूनच्या निकालाकडं लागलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना बघायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात उतरवले होते. तर महाविकास आघाडीकडून देखील राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र पिंजून काढला. या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी विशेष बातचीत केली असता, मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्नांची बेधडक उत्तरं देत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
शरद पवारांनासुद्धा धोका दिला असता : या मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते विकासाबद्दल बोलू शकत नाहीत. त्यामुळं ते फक्त गद्दार-गद्दार बोलतात. प्रचारात त्यांनी खालची पातळी गाठली. गद्दारीचं म्हणाल तर 2019 मध्ये याच 'उबाठा'नं आपल्या मित्र पक्षांसोबत गद्दारी करत महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही शिवसेना-भाजपा युती म्हणून लढलो. पूर्वी यांना काँग्रेस नको होती. बाळासाहेब असते तर यांना जोड्यांनी बडवलं असतं. गद्दारी यांनी एकदा नाही तर दोनदा केली. मोदींना हे भेटून आले. त्यावेळीदेखील ज्या शरद पवारांनी यांना मुख्यमंत्री केलं, त्यांनाही सोडण्याचा ठाकरेंचा डाव होता. पाच वर्ष त्यांना मुख्यमंत्रिपद हवं होतं. म्हणून ते बसून राहिले, अन्यथा त्यांनी शरद पवारांनासुद्धा धोका दिला असता." एकनाथ शिंदे यांच्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपुर्ण मुलाखत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...