हैदराबाद : विश्वात अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक घटना घडत राहतात. वर्षाच्या अखेरीस आकाशात 'ब्लॅक मून' दिसणार असताना आकाश निरीक्षकांना एक रोमांचक घटना अनुभवायला मिळेल. चंद्र तेजस्वी दिसत असला तरी, तुम्ही चंद्र अनेक रंगांमध्ये पाहिला असेल. तो कधीकधी लाल, पिवळा आणि कधीकधी गुलाबी दिसतो, परंतु आता तो चक्क काळा दिसणार आहे.
यूएस नेव्हल ऑब्झर्व्हेटरीनुसार, आकाशात 'ब्लॅक मून'ची ही अनोखी घटना 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:27 वाजता (227 GMT) घडेल. अमेरिकेतील नागरिकांना हा काळा चंद्र 30 डिसेंबर रोजी दिसेल, तर युरोप, आफ्रिका आणि आशियातील नागरिकांना, ही घटना 31 डिसेंबर 2024 रोजी दिसेल. भारतातही, 'ब्लॅक मून' 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:57 वाजता दिसेल.
का होतो चंद्र काळा ? : अमावस्येच्या रात्री सूर्य आणि चंद्र एकाच वेळी समांतर येतात. त्यामुळं चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीपासून दूर जातो, ज्यामुळे तो उघड्या डोळ्यांना पाहता येत नाही. तसंच आकाश काळं दिसतं. चंद्रचक्र सरासरी 29.5 दिवसांचं असल्यानं कधीकधी एका महिन्यात दोन अमावस्या देखील येऊ शकतात, ज्यामुळं ब्लॅक मूनची घटना घडते. ही 'ब्लॅक मून'सारखी एक खगोलीय घटना आहे, जी अत्यंत दुर्मिळ मानली जाते.
'ब्लॅक मून' म्हणजे काय : 'ब्लॅक मून'ची व्याख्या 'ब्लू मून'सारखीच आहे. परंतु 'ब्लू मून' पौर्णिमेशी संबंधित असला तरी, 'ब्लॅक मून' हा अमावस्येच्या पुढील रात्रीला दिसतो. भारतीय कॅलेंडरनुसार, ही रात्र शुक्ल पक्ष प्रतिपदेची रात्र असते, ज्याला 'नवचंद्र' असंही म्हणतात. पंचांगानुसार, जर एका ऋतूत चार अमावस्या असतील तर तिसऱ्या अमावस्येला 'ब्लॅक मून' म्हणतात. म्हणजेच, कोणत्याही एका महिन्यातील दुसऱ्या अमावस्येला 'ब्लॅक मून' देखील म्हणतात. तथापि, 'ब्लॅक मून' फार क्वचितच आढळतो.
चंद्र काळा दिसेल का? : काळा चंद्र स्वतः दिसणार नसला तरी रात्रीच्या आकाशावर त्याचा परिणाम लक्षणीय असेल. रात्रीच्या वेळी, चंद्राचा फक्त एक भागच दिसेल जो खूपच लहान असेल, तसेच तारे, ग्रह आणि अगदी दूरच्या आकाशगंगांची दृश्यमानता चांगली असेल. दुर्बिण किंवा टेलिस्कोपच्या मदतीने गुरूसारखे ग्रह पाहता येतील, जे जवळून दिसतील आणि शुक्र संध्याकाळी तेजस्वी दिसेल.
'हे' वाचलंत का :