नागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच भाजपाच्या अनेक मंत्र्यांना याखेपेस डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळं या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य रंगलं आहे. दरम्यान, त्यांची समजूत काढली जात असून पक्षातील इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?: “माझी सुधीर मुनंगटीवार यांच्याशी नीट चर्चा झाली आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस केला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. त्यामुळं काहीवेळा सरकारमध्ये काम करणारे पक्षात तर पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीर मुनगंटीवार अतिशय अनुभवी नेते आहेत. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याबद्दल काहीतरी विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही,” अशी प्रतिक्रिया देत मुनगंटीवार यांच्या नाराजीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter) महायुती सरकारची कामे: "काँग्रेसला ओबीसीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. काँग्रेसने उभ्या जीवनामध्ये ओबीसींवर अन्याय करण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाही. महाराष्ट्रातील ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं होतं. महाराष्ट्रात ओबीसी समाजाकरिता 48 जीआर हे आमच्या सरकारच्या काळात निघाले होते. मी आणि एकनाथ शिंदे यांनी 'महाज्योती'ची स्थापना केली, 52 हॉस्टेल्स , वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था, या सगळ्या बाबतीत महायुती सरकारच्या काळात कामे झाली. त्यामुळं काँग्रेसला दाखवण्याकरता एकही काम नाही. देशामध्ये पण इतक्या वर्षानंतर ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा पंतप्रधान मोदींनी दिला," अशा शब्दांत महायुती सरकार ओबीसी समाजावर अन्याय करत आहे या काँग्रेसच्या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिलं.
मेडिकलच्या अॅडमिशनमध्ये ओबीसींना आरक्षण :"60 ते 65 वर्षानंतर मेडिकलच्या अॅडमिशनमध्ये ओबीसींना आरक्षण हे मोदींनी दिलं. मोदी यांचं मंत्रिमंडळ असेल किंवा राज्यातलं आमचं मंत्रिमंडळ असेल, सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतात. त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्याबरोबर जो अन्याय होतो, त्याबद्दलचा राग तरी आमच्यावर काढू नये त्यांनी तो योग्य ठिकाणी काढावा" असा चिमटाही माजी विरोधी पक्षनेते तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी काढला.
हेही वाचा -
- यूपीए-२ च्या पराभवावरून मणिशंकर यांचा गांधी परिवारावर निशाणा, राज्यातील काँग्रेस नेत्यांना काय वाटते?
- मी मुख्यमंत्री असतो तर मंत्रिपदासाठी नांदेडचा विचार केला असता, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं
- "...त्या मंत्र्याचा पुनर्विचार केला जाईल", मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? वाचा सविस्तर