ठाणे : लव्ह प्यार और धोका या हिंदी चित्रपटासारखी धक्कादायक कथा समोर आली आहे. सोशल माध्यमांवर सुरु झालेल्या प्रेम कहाणीचा अंत एक 27 वर्षीय तरुणीला भलताच महागात पडला. "या पीडित तरुणीवर 38 वर्षीय आरोपीनं प्रेमाचं नाटक करत तिच्यावर बलात्कार करून तिला ब्लैकमेल करत विवाह करण्यास भाग पाडलं. मात्र त्यानंतरही पीडितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन सिगारेट आणि गरम तव्याचे चटके देत, तिला जाळण्याचा प्रयत्न केला," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं
सोशल माध्यमांवर लव्ह प्यार और धोका : मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार 27 वर्षीय पीडित तरुणी उल्हासनगर शहरात कुटूंबासह राहते. तिची ओळख उल्हासनगर शहरात राहणाऱ्या 38 वर्षीय सुनील हीरानंदानी याच्याशी सोशल माध्यमांवर झाली. त्यानंतर सोशल माध्यममातून दोघांमध्ये मैत्री होऊन 2021 साली दोघांमध्ये प्रेम कहाणी सुरू झाल्याचं पीडितेनं तक्रारीत नमूद केलं. त्यातच पीडितेला बाहण्यानं लॉजवर नेऊन तिच्यावर नराधमानं बलात्कार केला. खळबळजनक बाब म्हणजे बलात्कार करतानाचा मोबाईल कॅमेऱ्यात अश्लील व्हिडिओ आरोपीने काढला होता. हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार पीडितेवर अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेनं केली.
विवाह करण्यास तरुणीला पाडलं भाग : पोलीस अधिकारी पडवळ यांनी माहिती दिली की, "आरोपीनं पीडित तरुणीला विवाह करण्यास भाग पाडलं. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या आईनं मध्य प्रदेश राज्यातील ग्वालियर इथं तिला नेलं याठिकाणी तिला एका खोलीत बंद करत तिच्या डोक्यावरील केस कापले. आरोपींनी विवाह केल्यानंतर पीडितेला सिगरेटचे चटके दिले तर आरोपीच्या आईनं गरम तवा मारून तिला गंभीर जखमी केलं."
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : दुसरीकडं आरोपी तरुणानं पीडितेच आधारकार्ड पॅनकार्ड या कागदपत्रांचा दुरुपयोग करत धमकी दिली. तुझ्या आई वडिलांकडून पैसे नाही आणले तर तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल, अशी वारंवार धमकी देत असल्यानं अखेर पीडित तरुणीनं धाडस करत तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचं कथन केलं. त्या आधारावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पडवळ यांनी दिली. पोलीस पथक या घटनेचा अधिक तपास करीत असून याप्रकरणात अद्यापपर्यत कोणालाही अटक केली नसल्याचंही पडवळ यांनी सांगितलं
हेही वाचा :