मुंबई : गुरुवारी मध्यरात्री प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात चाकूनं हल्ला करण्यात आला. या घटनेची चर्चा संपूर्ण देशात सध्या सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा विभागानं तत्काळ सूत्रे हलवली आणि संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत असून, संबंधित आरोपी हा चोरीच्या उद्देशानं नाही, तर खंडणीच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरी घुसला होता. अभिनेता सैफ अली खानची हाऊस हेल्प लिमाच्या जबाबात हा खुलासा झाला आहे.
एक कोटी रुपयाची केली मागणी : संबंधित आरोपीनं एक कोटी रुपयांची मागणी केल्याचं लिमा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. सैफच्या घरात काम करणारी मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यात एक कोटी रुपयांवरून भांडण झालं. हल्लेखोराने मोलकरणीकडं एक कोटी रुपयांची मागणी केली. यात या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचे रूपांतर हिंसाचारात झालं. सैफनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीनं त्याच्यावर चाकूनं हल्ला केला, अशी माहिती लिमा यांनी पोलिसांना दिली आहे.
मोलकरणीकडं केली पैशांची मागणी : सैफचा मुलगा जहांगीरची देखभाल करणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या लिमा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात याचा खुलासा झाला. मात्र हल्लेखोर मोलकरणीकडं पैशांची मागणी का करत होता? आणि त्यांच्या वादाचं खरं कारण काय होतं? हे स्पष्ट झालं नाही. सध्या पोलीस याचा देखील सखोल तपास करत आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "या हल्ल्याबाबत पोलिसांनी सर्व प्रकारची माहिती दिली आहे. कशा प्रकारे हल्ला झाला, कसा झाला आणि कोणत्या प्रकारे हल्ला करण्यात आला त्याचं सर्व ब्रिफिंग पोलिसांनी दिलं आहे. कोणत्या प्रवृत्तीतून हा हल्ला झाला याबाबत सर्व पोलिसांनी माहिती दिलेली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत".
विरोधकांनी केली सरकारवर टीका : सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणामुळं मुंबई सुरक्षित नाही, अशी टीका विरोधकांनी सरकारवर केली असून, टीका करणाऱ्या सर्व विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, "मुंबई हे शहर सर्वात सुरक्षित आहे. कधी कधी काही घटना घडतात. त्याकडं गंभीरपणे पाहिलं पाहिजे. पण, मुंबई सुरक्षित नाही, असं म्हटल्यानं मुंबईची प्रतिमा खराब होते. त्यामुळं मला वाटतं मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे."
हेही वाचा -