बुलढाणा Clash between Congress Leaders : खामगाव इथं महाविकास आघाडीकचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन कऱण्यात आलं होतं. मात्र महाविकास आघाडीची सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडलीय. या घटनेनं काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलीय.
नेमकं काय घडलं : महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी खामगाव येथील जे. व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील आणि स्थानिक महाविकास आघाडीचे नेते मंचावर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचं भाषण संपताच नेते आपल्या मार्गानं निघाले. दरम्यान काही वेळातच खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा सभास्थळावरुन बाहेर पडत असताना समोरुन काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांची गाडी तिथं आली. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरुन शाब्दिक चकमक झाली. काही वेळानं या शाब्दिक वादाचं रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं. यावेळी काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. तसंच त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेमुळं सभास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रकरण सोडवलं. मात्र या घटनेमुळं काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलीय.