मुंबई-राज्यातील विधानसभा निवडणुकीचं सध्याचं चित्र पाहिल्यास राजकीय नेतेच राजकीय निष्ठा, विचारधारा आणि तत्त्वांना दुय्यम स्थान देत असल्याचं पाहायला मिळतंय. राजकीय पक्ष अनेकदा घराणेशाहीवरून एकमेकांवर चिखलफेक करतात. परंतु तरीही निवडणुकीच्या काळात प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांची मुले-मुलीही निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यातील एक भाजपाच्या तिकिटावर तर दुसरा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवतोय. दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेसुद्धा ठाकरे घराण्याचा दबदबा कायम राहण्यासाठी राजकारणात उतरलेत. कट्टर हिंदुत्वाचे राजकारण करणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसऱ्या पिढीतील दोन तरुण नेते मुंबईतील दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडणूक लढवतायत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे वरळीतून, तर ठाकरे कुटुंबातील मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
ठाकरे घराण्यातील वाद सर्वश्रुत :2019 मध्ये आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रभावशाली ठाकरे घराण्यातील पहिले सदस्य होते, जे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरत निवडून आले. तोपर्यंत त्यांचे वडील उद्धव ठाकरे किंवा काका राज ठाकरे यांनी कधी निवडणूक लढवली नव्हती. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूकही लढवली होती. मात्र आता राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरे यांनाही मनसेतर्फे माहीममधून उमेदवारी दिलीय. तसेच वरळीतून पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून, त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांचं आव्हान असणार आहे. थेट ठाकरे घराण्यातील नसले तरी वरुण सरदेसाई हेही उद्धव ठाकरेंच्या वतीने वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांच्या मावशीचे पुत्र आहेत. ३१ वर्षीय वरुण सरदेसाई हे व्यवसायाने अभियंता असून, शिवसेनेच्या युवा सेनेशी संबंधित आहेत.
पवार घराण्याची सत्ता अन् संघर्ष : ठाकरे कुटुंबाप्रमाणेच पवार कुटुंबालाही अंतर्गत कलहामुळे नव्या आव्हानांना सामोरे जावं लागतंय. त्यांचे पुतणे अजित पवार यांनीसुद्धा राष्ट्रवादीचे दोन भाग केलेत. उद्धव ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेनेही शरद पवारांबद्दल सहानुभूती व्यक्त करत त्यांना कठीण काळात साथ दिली. आता शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उभं केलंय. अजित पवारांना आव्हान देणारे युगेंद्र पवार हे खरं तर त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र असून, त्यांच्याच काकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवल्याचा हा बदला घेण्याचा प्रकार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार झाल्यात. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. अनिल देशमुख हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये गृहमंत्री होते आणि त्यांना राजीनामा देऊन तुरुंगात जावे लागले होते.
संभाजी पाटील निलंगेकर भाजपाच्या तिकिटावरून लढणार:नांदेडमधील भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. तर मुंबईत मालाड पश्चिम मतदारसंघातून भाजपा नेते आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मुस्लिमबहुल मतदारसंघात काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात विनोद शेलार लढणार आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातही काँग्रेसची ताकद आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, परंतु त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर भाजपाच्या तिकिटावरून इथून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकरांना काँग्रेसच्या अभयकुमार सतीशराव साळुंखे यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. तसेच कणकवली आणि कुडाळ मतदारसंघांतून नारायण राणे यांचे पुत्र अनुक्रमे नितेश राणे आणि निलेश राणे नशीब आजमावत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपा नेते बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते भाजपाकडून निवडणूक लढवतायत. तसेच कल्याण पूर्व मतदारसंघातून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोकणातील राजापूर मतदारसंघातून ठाकरे गटाकडून राजन साळवी रिंगणात असताना तिथे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत साळवींना आव्हान देणार आहेत. वरळीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे रिंगणात आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून आदित्य ठाकरेंचे बंधू वरुण सरदेसाई ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच विक्रोळी मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत निवडणूक लढवतायत. सांगलीतील तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनच शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना, तर बारामती मतदारसंघातून शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. बीडमधील परळी मतदारसंघातून भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालीय. तसेच गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघातून धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळालीय. धारावीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांना संधी मिळालीय, तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघांतून अनुक्रमे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीय. तसेच अमरावती मतदारसंघातून पंजाबराव देशमुख यांचे पुत्र सुनील देशमुख यांना काँग्रेसकडूनच उमेदवारी मिळालीय. सावनेर मतदारसंघातून काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नवी मुंबईतून भाजपाकडून गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नशीब आजमावत आहेत.
भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाणांना आव्हान : भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण आणि काँग्रेसचे उमेदवार तिरुपती कदम यांच्यात लढत होणार आहे. तसेच मालाड पश्चिम मतदारसंघातून आशिष शेलार यांचे भाऊ, विनोद शेलार विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार अस्लम आर शेख यांच्यात सामना होणार आहे.निलंगा मतदारसंघातून शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार अभयकुमार सतीशराव साळुंखे यांच्यात लढत होणार आहे. कणकवली मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र नितेश नारायण राणे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर, असा सामना रंगणार आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या पत्नी, प्रतिभा पाचपुते विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्यात लढत असेल.