मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज ( 23 डिसेंबर) भेट घेतली. "राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. त्यामध्ये ओबीसी समाजाचं मोठं पाठबळ होतं. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली," अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
आठ ते दहा दिवसात निर्णय : "ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही. राज्यात जे काही सुरू आहे, त्यामुळं मला आठ ते दहा दिवस द्या. आठ ते दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू," असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. "आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल, त्याबाबत आपण संपूर्ण चर्चा करू," अशी विनंती देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं पुढील आठ ते दहा दिवसांनंतर नेमका काय निर्णय होतो, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.