महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

कमी कार्यकाळ बाकी असल्यानं अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय - Akola West Assembly By Election

Akola West Assembly By Election : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. नागपूर खंडपीठात मंगळवारी यावर सुनावणी झाली. अकोला पश्चिम पोटनिवडणुकीसाठी न्यायालयानं स्थगिती दिलीय.

Akola West Assembly Election
अकोला पश्चिमची पोटनिवडणुक रद्द

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 4:47 PM IST

Updated : Mar 26, 2024, 5:26 PM IST

नागपूर Akola West Assembly By Election : लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा पोटनिवडणूकांचीही घोषणा करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीसोबतच 26 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक देशभरात होणार आहे. यात महाराष्ट्रातील अकोला मतदारसंघातही (Akola Constituency) पोटनिवडणूक होणार होती. तेथील भाजपा आमदारांचं निधन झाल्यानं पोटनिवडणूक लागली होती. परंतु, आता अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक रद्द करण्यात आलीय. एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी असल्यामुळं न्यायालयानं हा निर्णय दिलाय. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एम. एस.जवळकर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय.

पोटनिवडणूक घेण्याची काय गरज? : याचिकाकर्ते अनिल दुबे यांनी अकोला पश्चिम पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुख्य निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी असताना पोटनिवडणूक घेता येत नसल्याची तरतूद कायद्यात असल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला होता. विधानसभा निवडणूक पाच-सहा महिन्यांवर असताना अकोला पश्चिममध्ये पोटनिवडणूक घेण्याची काय गरज आहे? ही पोटनिवडणूक घेऊन मतदारांना वेठीस धरलं जात आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनं केला होता. न्यायालयानं याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद मान्य करत अकोला पश्चिम पोटनिवडणूकीची अधिसूचना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याच्यावतीनं ॲड. जगविजयसिंग गांधी यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाच्यावतीनं ॲड.श्रीकांत धारस्कर यांनी तर राज्य शासनाच्यावतीनं ॲड.देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.

या राज्यांमध्ये पोटनिवडणूक : बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक तसंच तामिळनाडूमध्ये विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत 97 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असून, लोकशाहीच्या या महान उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं होतं. तसंच निवडणूक आयोग देशभरात 10.5 लाख मतदान केंद्रे स्थापन करण्याची तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक? : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार होती. भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. त्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली.

Last Updated : Mar 26, 2024, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details