महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

भाजपा महाविकास आघाडीच्या दाव्यांची करणार पोलखोल; आखली जबरदस्त रणनीती - bjp steering committee - BJP STEERING COMMITTEE

भाजपाने महाविकास आघाडीच्या दाव्यांची पोलखोल करण्यासाठी संचालन समितीची स्थापना केलीय. महाविकास आघाडीने अडीच वर्षांच्या काळात केलेले आरोप, महायुतीच्या प्रकल्पांना दिलेल्या स्थगितीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार आहे.

devendra fadanvis and uddhav thackeray
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2024, 4:34 PM IST

मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीबरोबरच आता महाविकास आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत जाताना कुठल्या मुद्द्यांवर भर द्यावा, याकरिता दोन्ही बाजूने जोरदार तयारी केली गेलीय. विशेष म्हणजे भाजपाने यासाठी संचालन समितीची स्थापना केली असून, ही समिती महाविकास आघाडीने त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात केलेले आरोप, महायुतीच्या प्रकल्पांना दिलेली स्थगिती याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार आहे.




आरोपांची चिरफाड करणार :आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा सुपडा साफ झालाय. विशेष करून भाजपाला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागलाय. भाजपाला दोन अंकी आकडाही गाठता आला नाहीय. अशा परिस्थितीमध्ये यामधून बोध घेत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी केलीय. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून केल्या गेलेल्या फेक नरेटिव्हचा मोठा फटका महायुतीला बसलाय. या कारणाने भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत जनतेमध्ये महाविकास आघाडीची पोलखोल करण्यासाठी संचालन समितीची स्थापना केलीय. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर या समितीची जबाबदारी सोपवण्यात आली असून, ही समिती महाविकास आघाडीच्या आरोपांची माहिती एकत्रित करून त्यांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना सादर करणार आहेत. तसेच त्या अहवालावरून भाजपाचे वरिष्ठ नेते निवडणूक प्रचारामध्ये महाविकास आघाडीच्या आरोपांची चिरफाड करणार आहेत.



लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा चंग : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलेलं असताना राज्यात घडलेल्या आणि घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर महायुती व महाविकास आघाडीचे नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशात लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा भरून काढण्यासाठी महायुती सज्ज झाली असून, भाजपाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातील कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा चंग बांधलाय. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महायुतीवर बिनबुडाचे आरोप करण्यात आलेत. जनतेमध्ये महायुतीबाबत चुकीच्या गोष्टी पेरल्या आणि पसरवल्या गेल्यात. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेतल्या गेलेल्या विकासकामांच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचे कामं महाविकास आघाडी सरकारने केलंय. याची संपूर्ण माहिती एकत्रित करून काम करण्यात येणार असून, यानंतर याचा लेखाजोखा विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान जनतेसमोर मांडला जाईल, असं भाजपा संचालन समितीचे सदस्य संजय मयेकर यांनी सांगितलं आहे.



बाजी आम्हीच मारणार : महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील कामांचा लेखाजोखा, त्यांच्या काळातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भाजपाने संचालन समितीची स्थापना केलीय. यावर बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत की, आमच्यासाठी ही गोष्ट काही नवीन नाहीय. भाजपा किंबहुना महायुतीला माहीत आहे की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीमध्येसुद्धा त्यांचा सुपडा साफ होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला हरवण्यासाठी भाजपाने केंद्र स्तरावरून शर्तीचे प्रयत्न चालवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत केंद्रातील मंत्र्यांची फौज आणि राज्यातील भाजपाच्या, महायुतीच्या पाच नेत्यांनी आमच्या विरोधामध्ये रान उठवलं होतं. मुंबईतील लोकसभेच्या सहाच्या सहा जागा जिंकण्यासाठी तेव्हासुद्धा भाजपाने संचालन समितीची स्थापना केली होती. परंतु इतकं सर्व करूनही याचा परिणाम काय झाला? हे निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांना दिसून आलंय. याकरिता भाजपाने किंवा महायुतीच्या नेत्यांनी कितीही बढाया मारल्या, तरीसुद्धा आमचंच पारडं जड आहे आणि बाजी आम्हीच मारणार यात कुठलीही शंका नाही, असा आत्मविश्वास नाना पटोले यांनी बोलून दाखवला आहे.

हेही वाचा

  1. 'लाडकी बहीण योजने'वरुन संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले... - Sanjay Raut On Ladki Bahin Yojana
  2. कोल्हापुरामध्ये महायुतीत धुसफूस वाढली, उत्तरनंतर दक्षिणेत शिवसेनेनं थोपटले 'दंड' - Kolhapur Assembly Election

ABOUT THE AUTHOR

...view details