मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी भाजपा नेते गिरीश महाजन यांनी हजेरी लावल्यानंतर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, भाजपाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
भरत गोगावलेंची प्रतिक्रिया : याबाबत बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले म्हणाले, "शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांबाबत काय निर्णय घ्यावा, यासह सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य आहे. मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छुक असले, तरी मंत्रिपदी कुणाला घ्यायचं याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील व तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे आपण सांगू शकत नाही."
"आम्ही बुधवारी सर्वांशी चर्चा करू आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल. बुधवारच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आम्ही सर्वांचे मत जाणून घेणार आहोत. त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल." - विजय रुपाणी, भाजपा केंद्रीय निरीक्षक