नाशिक BJP Donation : राजकीय पक्षांना देणग्या देण्याची पूर्वपार परंपरा आहे. अलीकडंच इलेक्ट्रॉल बॉण्ड ही नवीन पद्धत सुरु झाली असली तरी तिला सर्वोच्च न्यायालयानं चाप लावला. एकाच पक्षाला मोठ्या प्रमाणात देणगी मिळाली असली, तरी त्याच पक्षाच्या आमदारांकडून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षासाठी देणगी गोळा केली जात आहे. विशेषतः त्यासाठी आमदार, पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावरुन थेट संदेश पाठवले जात आहेत. किमान पाच रुपयांपासून देणगी घेतली जात आहे. एकीकडं पीएम फंडात किती पैसे जमा झाले, याची माहिती देण्यासाठी भाजपा उत्सुक नसताना, दुसरीकडं सर्वसामान्य जनता महागाई होरपळत असताना देणग्या का मागतात, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.
भाजपाच्या वर्गणीला कॉंग्रेसचा आक्षेप : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झालीय. लोकसभेसाठी काही पक्षांनी उमेदवारी जाहीर केली, तर काही पक्षांचा घोळ अद्यापही सुरु आहे. त्यातच राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशात निवडणूक म्हटलं की आर्थिक खर्च आलाच आणि यासाठी काही धनाढ्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांना खर्चासाठी देणग्या मिळतात. या देणगीतूनच पक्षाचा खर्च चालतो, असं असलं तरी सध्या सत्तेत असलेल्या शहरातील भाजपा आमदारांनी सोशल मीडियावरुन एक संदेश व्हायरल करत विकसित भारतच्या अभूतपूर्व विकासाला चालना देण्यासाठी देणगी देण्याचं आवाहन केलंय. त्याखाली एक लिंक शेअर करण्यात आलीय. त्यावर क्लिक केल्यावर नमो ॲप ओपन होतं आणि त्यावर पाच रुपयांपासून देणगी देण्याची सुविधा आहे. जास्तीत जास्त कितीही देणगी देता येणार आहेत. शहरातील एका विशिष्ट पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून असे संदेश मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांच्या व्हाट्सअपवर वायरल करण्यात आले आहेत. ही बाब शहरवासीयांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे, तर दुसरीकडं विरोधात असलेल्या काँग्रेसनं यावर आक्षेप घेतलाय.