पुणे : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला अपयश मिळालं. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जे यश मिळालं होतं, तसं यश राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं नाही. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येत्या काळात बदल होणार असल्याचे संकेत आमदार रोहित पवार यांनी दिले आहेत.
शरद पवार फिरवणार भाकरी? : "आता वेळ आली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील हे लक्ष घालून संघटनेत मोठे बदल करतील. ज्या ज्या लोकांना जबाबदारी दिली जाईल, ते सर्व ताकदीनं येणाऱ्या काळात लढताना पाहायला मिळतील," असं यावेळी रोहित पवार म्हणाले. त्यामुळं आता लवकरच शरद पवार हे भाकरी फिरवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया (Source : ETV Bharat Reporter) रोहित पवारांवर मोठी जबाबदारी? : "आजपर्यंत दिलेली सर्व जबाबदारी मी पार पाडली आहे. नवखा असताना देखील जबाबदारी पार पाडली. बारामती लोकसभेची जबाबदारीही माझ्यावर देण्यात आली होती. तिथंही चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यामुळं यापुढंही पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन," असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त करत बदलाचे संकेत दिले आहेत.
'ईव्हीएम'वर शंका : "विधानसभा निवडणुकीत भाजपाचा स्ट्राईक रेट हा 88.6 टक्के असून, महायुतीचा हाच रेट 81 टक्के आहे. यांचा लोकसभेत स्ट्राईक रेट हा जवळपास 30 टक्के होता. विधानसभा निवडणुकीत भाजपाला 'लाडकी बहीण योजने'चा नक्कीच फायदा झाला. ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार होते, तिथे १० टक्क्यांचा फायदा हा ईव्हीएममध्ये फेरफार करुन झाला असं दिसत आहे. तसंच ईव्हीएममध्ये फेरफार करुन आठ टक्के फायदा हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना झाला असावा. त्यामुळं काहीतरी गडबड असून, ईव्हीएमबाबतीत काँग्रेस पुढाकार घेत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. उद्धव ठाकरे देखील याबाबत सकारात्मक आहेत," असं म्हणत रोहित पवार यांनी 'ईव्हीएम'वर शंका उपस्थित केली.
हेही वाचा -
- एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहण्याच्या विचारात? अजित पवारांच्या भूमिकेमुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर घसरली
- ईव्हीएम मशीनमध्ये घोळ अन् 15 टक्के मतं सेट? मतमोजणी प्रक्रियेवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...
- अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या पक्षापेक्षा कमी मते मिळूनही जागा जास्त; नेमका गोंधळ काय?