छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजलं असून औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. त्यात ठाकरे गटाने अद्याप उमेदवारी कोणालाही जाहीर केली नसली तरी, संभ्याव्य उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचं नाव समोर येताच, आजी माजी नेत्यांनी हा उमेदवार नको अशी भूमिका घेतली आहे.
खैरे यांच्यासमोर मोठ आव्हान : शिवसेनेचे जिल्ह्याचे पहिले जिल्हाध्यक्ष आणि भाजपाचे विद्यमान नेते सुभाष पाटील (Subhash Patil) यांनी जोरदार टीका केली आहे. खैरेंना पाडण्यासाठी मी पण निवडणूक लढवू शकतो असा इशारा, त्यांनी दिलाय. तर दुसरीकडं ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उमेदवार बदलण्याची मागणी पक्षाकडं केली असल्यानं खैरे यांच्यासमोर मोठ आव्हान निर्माण झालं आहे.
जुन्या शिवसैनिकाचे आव्हान : सुभाष पाटील सध्या भाजपाचे कार्यकारणी सदस्य असून १९९० पासून जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. कालांतराने खैरे आमदार झाले आणि सुभाष पाटील मागे पडले. खैरे यांनी संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याचे खूप मोठे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केलाय. जर खैरे यांचा सारखा उमेदवार पुन्हा निवडणूक लढणार असेल तर मी पण लोकसभा लढवू शकतो. असा उमेदवार जो आपल्या भागाला मागे टाकेल, नुकसान करेल या उमेदवाराला मतदार मान्य करणार नाही. खैरे यांना उमेदवारी दिल्यास भाजपा त्यांचा पराभव करु शकते. तशी तयारी पक्ष करत आहेत. त्यामुळं जुने शिवसैनिक खैरे यांच्या कामकाजाबाबत समाधानी नसल्याचं पाहायला मिळतंय.