मुंबई : विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा आणि फक्त १.५५ टक्के मतं मिळालेल्या मनसेवर पक्ष चिन्ह रेल्वे इंजिन जातंय की काय? अशी परिस्थिती उद्भवली आहे. "महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल, आपले कार्यकर्ते, पदाधिकारी कसे टिकतील यावर चिंतन करावं," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी राज ठाकरे यांना लगावला. "राज ठाकरे हे एक नरेटिव्ह सेट करु पाहत आहेत. मात्र, तो जनतेला कधी पटणार नाही," अशी बोचरी प्रतिक्रिया भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया : राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. "यासंदर्भात आपण महाराष्ट्रात बोलू," असं फडणवीस म्हणाले. फडणवीस हे सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
प्रतिक्रिया देताना आनंद परांजपे (ETV Bharat Reporter) राज ठाकरे यांची बदलणारी भूमिका : राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या जागांवर राज ठाकरे यांनी वरळी येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात बोलताना त्या पक्षाचे एवढे आमदार कसे काय जिंकून आले? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आनंद परांजपे म्हणाले की, "या महाराष्ट्राने राज ठाकरे यांची बदलणारी भूमिका पाहिली आहे. त्यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिलं. विधानसभेत महायुतीत येणार की नाही, अशी गोंधळलेली स्थिती मनसेची झाली होती. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला. पण मनसे कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलताना दिसली. अशा गोंधळलेल्या अवस्थेमुळेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेवर कधी विश्वास बसला नाही."
आम्ही कधीही तडजोड केली नाही : भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "राज ठाकरे हे जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो अर्धवट माहितीच्या आधारे आहे. राज ठाकरे हे जे सांगू पाहत आहेत, त्याचं उत्तर एकच आहे की, आम्ही राष्ट्रनिर्माण करताना राष्ट्रीय पक्ष म्हणून कधीही तडजोड केली नाही. एक भारत श्रेष्ठ भारत, पोखरण, एनआरसी, सीएए यासारख्या विषयावर भाजपानं कधीही तडजोड केली नाही. मात्र, वेळ, काळ आणि राजकीय परिस्थिती पाहून सरकार चालविताना जे तत्कालिक घडते, त्याचा राज ठाकरे हे एक अर्थ लावून निरुपण करु पाहत आहेत. परंतु, ते जे नरेटिव्ह सेट करु पाहत आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाही."
काय म्हणाले होते राज ठाकरे? : "भाजपाला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 132 जागा मिळाल्या. यापूर्वी 105 आणि 2014 ला 122 जागा मिळाल्या होत्या. पण आता अजित पवारांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या. यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? ज्यांच्या जीवावर अजित पवार, छगन भुजबळ यांनी राजकारण केलं, त्या शरद पवारांचे फक्त 10 आमदार जिंकून आलेत. त्यांचे 8 खासदार होते. अजित पवार यांचा केवळ एक खासदार जिंकून आला होता. 4 महिन्यांमध्ये एवढा निकाल बदलतो का?" असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. ज्यांच्यावर आरोप झाले, ते भाजपामध्ये आले, अशांची यादीच राज ठाकरेंनी मेळाव्यात वाचून दाखवली. "राजकीय भूमिका कोणी बदलली हे महाराष्ट्राला माहिती असायला हवं," असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, विजयसिंह मोहिते पाटील अशा नेत्यांची उदाहरणे देत राज ठाकरे म्हणाले की, "ज्यांच्यावर आरोप झाले, ते सगळे भाजपात गेले. त्यांना कोणी विचारत नाही की, भूमिका का बदलली."
हेही वाचा -
- विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात "इतना सन्नाटा क्यों है भाई", राज ठाकरेंची फटकेबाजी अन् भाजपावर निशाणा
- 'वक्फ बोर्डाने जमिनी परत करून स्वतःचं राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं,' लातूरमधील प्रकरणावर राज ठाकरेंचं आवाहन
- "महायुतीला राज ठाकरेंची गरज नाही"; रामदास आठवलेंचं मोठं विधान