सांगली : चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामधील एका गावात घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली. तर या घटनेमुळं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
मृतदेह लपवला पेटीत : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात आपल्या आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (6 फेब्रुवारी) उघडकीस आला. चिमुकली ही आपल्या घरासमोर राहणाऱ्या आरोपीच्या दारात असलेल्या बदामाच्या झाडाखाली खेळण्यासाठी गेली होती. तेव्हा नराधमानं तिच्यासोबत खेळत असल्याचं भासवून तिला घराजवळ असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये नेलं. तिथं तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन हत्या केली. त्यानंतर चिमुकलीचा मृतदेह एका पोत्यात भरून त्यानं पत्र्याच्या पेटीत लपवून ठेवला. इतकंच नाही तर त्यानंतर तो पेटीवर झोपला.
आरोपीला अटक : भरपूर वेळ झाला तरी नात घरी न आल्यानं तिच्या आजीनं शोध सुरू केला. तेव्हा त्यांनी घरी जाऊनही चिमुकलीची चौकशी केली. मात्र, त्याला काहीच माहीत नसल्याचं त्यानं भासवलं. शोध घेऊनही चिमुरडी न सापडल्यानं गावातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाकडून गावात चिमुकलीचा शोध सुरू करण्यात आला. यादरम्यान काहीजणांनी चिमुकलीला संशयित आरोपीलासोबत पाहिल्याचं सांगितलं. यानंतर संशयित आरोपीच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन तपासणी केली असता, पत्र्याच्या पेटीमध्ये मृत अवस्थेत बालिकेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर लगेच संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस निरीक्षक रितू खोकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा गावामध्ये दाखल झाला होता. त्यानंतर चिमुकलीचा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
जत तालुक्यामधील एका गावात एका चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय. फास्ट्रेक कोर्टात गुन्हा चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असं आढळल्यास कारवाई केली जाईल.- संदीप घुगे, पोलीस अधीक्षक
आज जत बंदचं आवाहन : घटनेची माहिती मिळताच जतचे आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, "गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलीय. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताचं गतीनं तपास करत मुलीचा शोध घेत, एका संशयिताला ताब्यात देखील घेतलंय. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (7 फेब्रुवारी) दुपारनंतर जत बंदचं आवाहन काही सामाजिक संघटनांनी केलंय."
हेही वाचा -