नवी दिल्ली- देशात सातत्याने वाढत असलेल्या बँकिंग फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक मोठे पाऊल उचललंय. चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी आरबीआयने सायबर फसवणुकीपासून लोकांना वाचवण्यासाठी बँका आणि बिगर बँकिंग कंपन्यांना एक विशेष 'डोमेन नेम' दिले जाणार असल्याचं सांगितलंय. बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, डिजिटल फसवणुकीत वाढ ही चिंतेची बाब आहे. यासाठी प्रत्येकाने आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे. "सायबर फसवणूक रोखण्यासाठी नॉन बँकिंग कंपन्यांना 'FIN.in' हे एक विशेष डोमेन दिले जाणार आहे. त्याची नोंदणी एप्रिलमध्ये सुरू होणार असल्याचंही आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलंय.
विशेष डोमेन नाव दिले जाणार : गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, "सायबर फसवणूक रोखण्यासाठी बँकांना 'bank.in' हे विशेष डोमेन नाव दिले जाणार आहे आणि नॉन बँकिंग कंपन्यांना 'fin.in' हे डोमेन नाव दिले जाईल. यामुळे बँकिंग फसवणुकीला आळा बसण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. वित्तीय सेवांच्या जलद डिजिटायझेशनमुळे सुविधा आणि कार्यक्षमता वाढल्याचंही मल्होत्रा यांनी अधोरेखित केलंय. सायबर धोक्यांसह डिजिटल फसवणुकीचा धोकादेखील वाढलाय.
5 वर्षांनंतर रेपो रेटमध्ये कपात : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 25 बेसिस पॉइंटची कपात केलीय. आता रेपो दर 6.5 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी झालाय. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, हा निर्णय एकमताने घेण्यात आलाय. चलनवाढीचा दर कमी झाला आहे आणि तो आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने चलनविषयक धोरण समितीने (MPC) हा निर्णय घेतला. शहरी भागात मागणी अजूनही कमकुवत आहे, परंतु ग्रामीण भागात ग्राहकांची मागणी सुधारत आहे, असंही आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचा-