महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"घाबरवण्यासाठी छापेमारी"; अनिल देशमुखांनी लिहिलेलं पुस्तक आलं समोर, देवेंद्र फडणवीस पुन्हा टार्गेटवर - ANIL DESHMUKH

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेल्या पुस्तकाची काही पानं समोर आली आहेत. यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं असल्याचं दिसून आलं.

Book Diary of Home Minister
डायरी ऑफ होम मिनिस्टर (File PHoto)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2024, 3:57 PM IST

नागपूर: कथित १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अनेक महिने कारागृहात काढावे लागले होते. याकाळात अनिल देशमुख यांनी घडलेल्या घटनांवर आधारित एक पुस्तक लिहिलं. यात त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र असल्याचा दावा केलाय. 'डायरी ऑफ होम मिनिस्टर' नावानं हे पुस्तक लिहिलं असून, लवकर पुस्तकाचं प्रकाशन होणार होते. मात्र, निवडणुकीची धामधूम असल्यानं पुस्तक येत्या दोन ते तीन दिवसात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यातील काही पानं आज अनिल देशमुख यांनी सार्वजनिक केली आहेत.

प्रतिक्रिया देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ETV Bharat Reporter)

अनिल देशमुख यांनी केलाय आरोप: देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आणि वरच्या लोकांच्या मदतीनं ईडी व सीबीआय तपासाचा ससेमिरा लावून कारागृहात टाकलं, असा आरोप अनिल देशमुख यांनी पुन्हा केलाय. कारागृहात असताना त्यांनी 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात ते लिहितात की, "उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र द्यावं याकरिता फडणवीस यांचा दूत माझ्याकडं आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या त्या दूताचं नाव सुमित कदम होतं." संपूर्ण घटना कशी घडली याबाबत मी या पुस्तकात एक्स्पोज केलं असल्याचं ते म्हणाले.

डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तकाती पान 19 (Anil Deshmukh Book)

...म्हणून माझ्या घरावर छापेमारी झाली : "मी देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार वागलो नाही त्यामुळं दुसऱ्या दिवशीच माझ्या घरी ईडीची रेड झाली. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी गलिच्छ राजकारण फडणवीस यांनी केलं," असा उल्लेखही पुस्तकात करण्यात आलाय.

डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तकाती पान 97 (Anil Deshmukh Book)

काय आहे पुस्तकात?: एखाद्या प्रकरणात तपास अधिकारी कोण असणार हे सीबीआयचा संचालक ठरवत असतो, केंद्रीय गृहमंत्री नाही. परमबीर सिंह यांनी याचिकेत माझ्यावर केलेल्या आरोपांवर सीबीआयनं विश्वास दाखवला होता, जेणेकरून तपास करता यावा की गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नेमणुकांसंदर्भात आपल्या पदाचा गैरवापर केला होता. तसंच पोलिसांच्या कर्तव्यपालनात हस्तक्षेप केला होता.

डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तकाती पान 100 (Anil Deshmukh Book)

परमबीर सिंहनं केलं होतं कबूल : परमबीर सिंह यांचं वर्तन अतिशय संशयास्पद होतं. त्यांच्याच विरोधात राज्य पोलीस, भ्रष्टाचारविरोधी पथक आणि सरकारकडून चौकशी सुरू होती. 'अंबानी विस्फोटक कांड' आणि 'मनसुख हत्याकांड' प्रकरणातील भूमिकेवरून माध्यमांनी परमबीर सिंह यांच्याकडेच अंगुलिनिर्देश केला होता आणि नंतरच्या तपासात संशयाची सुई त्यांच्याभोवतीच फिरत होती. महत्त्वाचं म्हणजे, त्यांचा एकदम खास माणूस असलेल्या सचिन वाझेला अटक झाली होती आणि दुसरा खास माणूस असलेल्या प्रदीप शर्माला अटक होणार होती. अशा व्यक्तीच्या (परमबीर सिंह) जबाबांचा आधार घेतला गेला. गंमत म्हणजे त्या परमबीर सिंह यानेच नंतर कबूल केलं की, माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. मी केवळ ऐकीव माहितीच्या आधारे हे आरोप केले होते.

डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तकाती पान 101 (Anil Deshmukh Book)

घाबरवण्यासाठी छापे टाकले : यानंतर २४ एप्रिलला सीबीआयनं छापे टाकले. माझं नागपूरचं घर, कार्यालय, मुंबईतील सरकारी निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळी येथील माझा फ्लॅट अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. मात्र, ज्या पद्धतीने सीबीआयने हे छापे टाकले आणि उगाचच उलथापालथ केली, त्यावरून लक्षात आलं की हे छापे मला घाबरवण्यासाठी आहेत.

डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तकाती पान 102 (Anil Deshmukh Book)

फडणवीस यांचा माणूस भेटला: एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील गोष्ट, एक दिवस एक व्यक्ती माझं तेव्हाचं सरकारी निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर आला. कुणाचातरी संदर्भ देऊन मला भेटला. अगदी सामान्य अंगकाठीचा आणि तरुण होता. तो म्हणाला, "मला देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं आहे." माझ्या मनात आलं की, देवेंद्र फडणवीस तर माझ्याशी थेट बोलू शकत होते, मग त्यांनी या माणसाला कशाला पाठवलंय? मी त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानं सांगितलं 'समित' त्यावर मी त्याला त्याचं पूर्ण नाव विचारलं. तो पुन्हा म्हणाला 'समित कदम' मग मी विचारलं गाव कोणतं? तो म्हणाला सांगली जिल्ह्यातील मिरज, पुढे तो म्हणाला "मी देवेंद्र फडणवीस यांचा अगदी जवळचा माणूस आहे. त्यांनीच तुम्हाला भेटायला पाठवलं आहे. देवेंद्रजींचं म्हणणं आहे की, हे जे काही घडलंय त्यात तुमचा (अनिल देशमुखांचा) काहीच दोष नाहीय. तेव्हा देवेंद्रजींना तुम्हाला मदत करायची आहे."


हेही वाचा -

  1. पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीत १ कोटी ८० हजार २३३ रुपयांची वाढ; एकूण संपत्ती किती?
  2. दर्यापुरात राणांचा उमेदवार जिंकणार? महायुतीत गोची तर महाआघाडीत तिढा
  3. शिवसेना ठाकरे पक्षाची दुसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट?

ABOUT THE AUTHOR

...view details