मुंबई Akshay Shinde Encounter Case :बदलापूरमधील शाळेतील चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेचं कथित एन्काऊंटर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. न्यायालयानं याप्रकरणी लक्ष घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी अक्षयच्या पित्यानं याचिकेतून मागणी केली आहे. याप्रकरणी आज उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली. खंडपीठानं आरोपीसह चारही पोलीस अधिकाऱ्यांचे 23 आणि 24 सप्टेंबरचे कॉल रेकॉर्ड आणि सर्व कागदपत्रे आजच जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे.
खंडपीठाने केली सुनावणी :उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांवर या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांची सरबत्ती केली. अक्षय शिंदेच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्यातर्फे अॅड. अमित कटारनवरे यांनी बाजू मांडली तर राज्य सरकारतर्फे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली.
मृत्यूची निष्पक्षपणे चौकशी व्हावी :बदलापूर घटनेबाबत मृत आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सुनावणीत सरकारी वकिलाला सांगितलं की, शारीरिकदृष्ट्या कमकुवत माणूस पटकन रिव्हॉल्व्हर उघडू शकत नाही. हे फार सोपे नाही. आरोपीच्या पायात किंवा हातावर नाही तर थेट डोक्यात गोळी का लागली, असा सवाल उच्च न्यायालयानं केला आहे. आरोपीवरील गोळीबार टाळता आला असता. पोलिसांनी आधी त्याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न का केला नाही, असादेखील प्रश्न मुंबई उच्च न्यायलयाकडून उपस्थित करण्यात आला आहे. खंडपीठानं म्हटलं,"बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपींच्या मृत्यूची निष्पक्षपणे चौकशी व्हावी, एन्काऊंटर वेगळा असतो. याला एन्काऊंटर कसं म्हणणार? संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे," असंही मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.