मुंबई Abhishek Ghosalkar Murder Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री गोळीबार करण्यात आला. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा या दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसंच या मुद्द्यावरून आता विरोधक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. यामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. तसंच शनिवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचंही पटोले म्हणाले आहेत.
फडणवीस यांच्या 'त्या' वक्त्यावरून पटोले भडकले :अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तर विरोधी पक्षांची अवस्था अशी आहे, की आता एखाद्या गाडीखाली श्र्वान आला तरी ते, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील." फडणवीसांच्या या वक्तव्यावर टीका करत नाना पटोले म्हणाले की, "भाजपा प्रणित असलेले शिंदे, अजित पवार सरकार महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं काम करताय. गृहमंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्य करून राज्याची दुर्गती केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवले असून गृहमंत्र्यांना अशी जबाबदारी नाकारता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा." तसंच या संदर्भात आम्ही उद्या राज्यपालांची भेट घेणार असून राज्यात तात्काळ सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणार असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं.