सातारा : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात कोल्हापूर परिक्षेत्रात कोट्यवधींच्या रोकडसह दागिने, मद्यसाठा, अंमली पदार्थांसह २० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांना दिली.
पावणे सात कोटींची रोकड जप्त: विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून ते १० नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ६.६४ कोटी रुपयांची रोकड, २.८३ कोटी रुपये किंमतीची दारु, १९३ किलो गांजा, ७.५७ कोटीचे ९ किलो सोने आणि ६० किलो चांदी, १.८७ कोटी रुपये किमतीचा गुटखा, असा एकूण १९.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
प्रतिक्रिया देताना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलार (ETV Bharat Reporter)
२३ पिस्तूल, ३६ काडतुसे जप्त : निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या कलमान्वये हजारो संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसंच २३ पिस्तूल आणि ३६ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. तसंच कोल्हापूर परिक्षेत्रात आचारसंहिता भंगाचे १० दखलपात्र आणि १५ अदखलपात्र गुन्हे दाखल झाले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नार्कोटिक्स विभागाच्या श्वानाकडून वाहनांची तपासणी: कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ आहेत. त्यामुळे तीन जिल्ह्यात एकूण ३६ सीमा तपासणी नाके दिवस रात्र सुरू आहेत. तसंच या नाक्यांवर नार्कोटिक्स विभागाच्या श्वानांचा वापर करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई, उपद्रवी संशयितांवर कारवाई, अजामीनपात्र वॉरंटची बजावणी, कोबिंग ऑपरेशन, संवेदनशील भागात रुट मार्च सारखी कारवाई सुरू असल्याचंही विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं.
हेही वाचा -
- 'ऑपरेशन लोट्स'; भाजपानं प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर दिली; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा आरोप
- मतांसाठी १२५ कोटींचे मनी लाँड्रिंग? ईडीचे मुंबई, नाशिकसह गुजरातमध्ये छापे
- ट्रम्पेट चिन्हापुढे 'तुतारी' लिहून सुरू होता प्रचार; स्वराज्य सेनेच्या उमेदवारावर गुन्हा