नवी दिल्लीImran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तसंच माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान सत्तेत असताना त्यांच्यावर पाकिस्तानच्या गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. मंगळवारी (३० जानेवारी) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा इम्रान खान, शाह मेहमूद कुरेशी कोर्टरूममध्ये उपस्थित होते. त्यानंतर न्यायालयानं हा निकाल दिला आहे.
पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ :इम्रान खानसह त्यांचे सहकारी माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनाही दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळं पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफनं पक्षानं (पीटीआय) या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.