सोलापूर : सोलापूरचे सुपुत्र, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. वनविभागात सेवा करताना मारुती चित्तमपल्ली यांनी पक्षी, प्राणी आणि वनसंपदेविषयी अभ्यास करून अनेक पुस्तकं लिहिली आहेत. मारुती चित्तमपल्ली यांच्यामुळं मराठी शब्दकोशात अनेक शब्दांची भर पडलीय. मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदीही त्यांनी भूषवलं होतं. मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानं सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.
कोण आहेत मारुती चितमपल्ली? : मूळचे सोलापूरचे असणारे मारुती चितमपल्ली यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1932 रोजी झाला. चितमपल्ली हे प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक आहेत. अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक आणि वनाधिकारी म्हणून मारुती चितमपल्ली यांची ओळख आहे. सोलापूर येथे एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला झाला. मारुती भुजंगराव चितमपल्ली हे त्यांचं पूर्ण नाव आहे. चितमपल्ली यांच्या वडिलांना वाचनाचा छंद होता. शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. आपल्या मुलांनी विणकामाचे साचे चालवू नयेत, त्यांनी शिकावं ही त्यांची इच्छा होती. अभ्यासाचा वारसा घरातून चितमपल्ली यांना लाभला होता. त्यांच्या पूर्वजांकडून झाडे लावणे, झाडांवर प्रेम करणे या गोष्टी त्यांना मिळाल्या आहेत. लिंबामामा हे त्यांचे अरण्यविद्येतले गुरू होते.
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचा शैक्षणिक प्रवास : पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं शालेय शिक्षण सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल आणि नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून झालं. सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण चितमपल्ली यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतलं. नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसंच पुणे, पनवेल येथील संस्कृत पंडितांकडं संस्कृत भाषेचं आणि साहित्याचं अध्ययन केलं. जर्मन आणि रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना 1990 साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे.
- मारुती चित्तमपल्ली यांची खास प्रतिक्रिया : "एवढा आनंद यापूर्वी कधीच झाला नव्हता. मी सरकारचे आभार मानतो. आज मला सर्व जंगलातील दिवस आठवतात. मी मराठीला एक लाख नवीन शब्द दिलेत. ते सर्व शब्द मला आठवतात. सध्या तेच शब्द शब्दकोषात लिहिण्याचं काम सुरू आहे. वन्यप्राण्यांना वासावरून माणासाचा स्वभाव ओळखता येतो. वाघाला मासांहार करणारे ओळखू येतात. त्यामुळे हे हल्ले होतात. मी वयाच्या दहाव्या वर्षी मांसाहार सोडून दिला. कांदा खाणारे आणि लसूण खाणारे वन्यप्राण्यांना ओळखू येतात. पुरस्कार मिळाल्यानं आनंदच आनंद आहे, ", अशी प्रतिक्रिया चितमपल्ली यांनी दिली.
हेही वाचा -