मुंबई : मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याला भारत सरकारकडं सोपवण्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं तहव्वूर राणाची याबाबतची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानं त्याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राणा हा 26/11 हल्ल्यातील आरोपी असून, तो पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक आहे. राणा 26/11 हल्ल्यातील दोषी आरोपी असल्यानं त्याला भारताकडं सोपवण्याची मागणी करण्यात आली. त्याच वेळी राणानं आपल्या अटकेबाबत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानं त्याच्या भारतात आणण्याच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, आता ही याचिका फेटाळल्यानं त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तहव्वूर राणाची फेटाळली याचिका : मिळालेल्या माहितीनुसार, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आरोपावरून इलिनॉय शिकागो इथल्या फेडरल कोर्टात त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि निर्दोष मुक्तता करण्यात आली, असा युक्तिवाद तहव्वूर राणानं केला. ज्या आरोपांच्या आधारे शिकागो न्यायालयानं तहव्वूर राणाला निर्दोष मुक्त केलं, त्याच आरोपांवरून भारतानंही प्रत्यार्पणाची मागणी केली. तहव्वूर राणानं कनिष्ठ न्यायालय आणि यूएस कोर्ट ऑफ अपीलसह अनेक फेडरल न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाया लढल्या आणि हरला आहे.
तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात : तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याच्याशी राणाचा संबंध होता. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 लोकांनी आपला जीव गमावला. तहव्वूर राणानं पाकिस्तानी लष्करातही सेवा बजावली असून पाकिस्तानी लष्करात तो डॉक्टर होता. पुढं 90 च्या दशकात राणा कॅनडाला गेला आणि नंतर तिथलं नागरिकत्व घेतलं. कॅनडातून तहव्वूर राणा अमेरिकेत पोहोचला आणि तिथं त्यानं शिकागोमध्ये इमिग्रेशन कन्सल्टन्सी फर्म सुरू केली.
हा भारतीय कुटुनीतीचा विजय उज्वल निकम : याबाबत ईटीव्हीनं ज्येष्ठ सरकारी वकील आणि 26/11 हल्ल्यात सरकारची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, "हा भारतीय कूटुनीतीचा विजय आहे. तहव्वूर राणाला भारतात आणल्यानं अनेक बाबींवर स्पष्टपणे खुलासा होऊ शकतो. डेव्हिड हेडलीनं ईमेल करस्पॉन्डंट करून पाकिस्तानी आर्मी, आयएसआय आणि लष्कर-ए -तोयबा यांचे काय काय संबंध आहेत, ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे तहव्वूर राणाला भारतात आणणं ही बाब मोठी आहे."
कोण आहे तहव्वूर राणा? : मुंबईत 2008 मध्ये करण्यात आलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 175 नागरिकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणा आरोपी असल्याचा आरोप आहे. भारत आणि अमेरिकेत 1997 च्या प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी सैन्यदलाचा माजी डॉक्टर आहे. त्यानं कॅनडामध्ये स्थलांतर केल्यानंतर इमिग्रेशन सेवा सुरू केली. अमेरिकेनं यापूर्वी 26/11 मधील आरोपी डेव्हिड हेडली आणि दाऊद गिलानी यांच्या प्रत्यार्पणाला नकार दिला. त्यामुळे तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण भारतासाठी काही प्रमाणात दिलासादायक असणार आहेत. आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राणाच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली.
हेही वाचा :
- तहव्वूर राणाच्या पळवाटा बंद, भारतात प्रत्यार्पण होण्याच्या प्रक्रियेवर उज्ज्वल निकम काय म्हणाले?
- दहशतवादी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्यात येणार; उज्ज्वल निकम यांची माहिती
- मुंबई 26/11 बॉम्बस्फोट प्रकरण : दहशतवादी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण करणं योग्य, भारताला पूर्ण अधिकार, यूएस अॅटर्नीचा जोरदार युक्तीवाद - Mumbai Terror Attack