इस्लामाबाद Pakistan Election 2024: पाकिस्तानातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नवं सरकार स्थापन करण्यासाठी आज निवडणूक होत आहे. इमरान खान तुरुंगात असल्यानं नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) आणि बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात मुख्य लढत मानली जात आहे. या शर्यतीत नवाझ शरीफ आघाडीवर असून ते चौथ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होऊ शकतात, असं बोललं जातंय. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांना सैन्य दलाकडून मिळणारा प्रचंड पाठिंबा आहे.
नवाज शरीफांना सैन्याचा पाठिंबा : 'प्रोजेक्ट इम्रान'नंतर पाकिस्तानी सैन्यानं नवाज शरीफ यांच्यावर डाव लावलाय. नवाज शरीफ यांच्या विजयाची खात्री करण्यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानी सैन्याच्या गुड बुकमध्ये त्यांचं अव्वल स्थान आहे. इम्रान खान यांच्यासोबत सैन्याचा तणाव वाढला असून, त्यामुळं पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ यांची निवड निश्चित मानली जात आहे.
पाकिस्तानात निवडणुकीसाठी तयारी कशी : पाकिस्तानात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुमारे 6,50,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत देशातील 12.85 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारनं अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा सील केल्या आहेत. मतदान अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली 90 हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचवण्यात आलंय. आज सकाळी 8 वाजता मतदान सुरु झालं असून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलीय. निवडणूक आयोगानं पाकिस्तानात एकूण 9,07, 675 मतदान केंद्रं तयार केली आहेत. यात पुरुष मतदारांसाठी 25,320, महिलांसाठी 23,952 आणि इतरांसाठी 41,402 मतदान केंद्रं बनवण्यात आली आहेत. आयोगानं दिलेल्या माहितीनुसार एकून मतदान केंद्रापैकी 29,985 संवेदनशील भागात आहेत तर 16,766 मतदान केंद्र अतिसंवेदनशील भागात आहेत.