इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गुरुवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात किमान 50 जण ठार झाल्याची माहिती आहे. 20 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिया मुस्लिम प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक पत्रकाराने सांगितलं की, "तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागात वाहनांवर हल्ला करण्यात आला. या ताफ्यात 200 हून अधिक वाहनांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितलं.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसंच त्यांनी प्रांतीय कायदा मंत्री आणि मुख्य सचिवांना कुर्रमला जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळही पाठवण्यात आले आहे. प्रांतातील सर्व रस्ते सुरक्षित करण्यासाठी प्रांतीय महामार्ग पोलीस युनिट स्थापन करण्याचे काम करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गंडापूर यांनी कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली.
"निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे. या घटनेत सहभागी असलेले लोक कायद्याच्या तावडीतून सुटू शकणार नाहीत," असं खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर म्हणाले.
दहशतवाद्यांनी याआधी या प्रांतात अनेकवेळा हल्ले केले होते. मात्र, गुरुवारी केलेल्या हल्ल्याची तीव्रता जास्त होती. 'एपी' न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी पाराचिनारहून पेशावरला जात होते. ज्या भागात हल्ला झाला तो भाग कुर्रम जिल्ह्यात येतो.
हेही वाचा -