नवी दिल्ली/ढाका: इस्कॉनचे प्रमुख सदस्य चिन्मय कृष्णा दास यांना सोमवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथे अटक करण्यात आली. ते चितगावला जाण्यासाठी ढाका विमानतळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. देशद्रोह केल्याचा दावा करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अत्याचार वाढल्यानं हिंदू समुदायानं काढलेल्या अनेक रॅलींमध्येही ते सहभागी झाले होते.
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये अराजकता आहे. बांगलादेशातील हिंदू रहिवाशांवर होणाऱ्या हिंसाचाराला विरोध करणाऱ्या इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना अटक करण्यात आली. चिन्मय दास हे बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सातत्यानं आवाज उठवत आहेत. ते सनातन जागरण मंचचे प्रवक्तेही आहेत.चिन्मय कृष्ण दास प्रभू यांनी 22 नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील रंगपूर येथे हिंदूंच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत बांगलादेश इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू म्हणाले की," येथील सरकार हिंदू समुदायावर अत्याचार करून देशामध्ये फूट पाडण्याचा कट करत आहे".
मंदिरांच्या सुरक्षेची चिंताजनक स्थितीयापूर्वी बांगलादेशातील मेहेरपूर येथे इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला. त्यावर चिन्मय प्रभू रॅलीत म्हणाले होते, " मंदिरांच्या सुरक्षेची चिंताजनक स्थिती आहे. हिंदू आणि अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटत आहे. हिंदू हे पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामार्गे भारतात जात आहेत. कट्टरवादी जमात-ए-इस्लामीचे लोक बीएनपीच्या मदतीनं इस्कॉन आणि इस्कॉनच्या भाविकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत".
चिन्मय कृष्ण दास यांना तात्काळ सोडावे-इस्कॉन- इस्कॉननं एक्स मीडियावर पोस्ट करत चिन्मय यांच्या अटकेवर नाराजी व्यक्त केली. तसेच भारत सरकारनं कारवाई करावी, अशी मागणी केली. इस्कॉननं पोस्टमध्ये म्हटलं, "इस्कॉन बांगलादेशच्या प्रमुख नेत्यांपैकी एक श्री चिन्मय कृष्ण दास यांना ढाका पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त त्रासदायक आहे. इस्कॉनचा दहशतवादाशी संबंध आहे, असा निराधार आरोप करणे अपमानास्पद आहे. भारत सरकारनं तात्काळ पावले उचलवाती. भारत सरकारनं बांग्लादेश सरकारशी बोलून इस्कॉन ही शांततामय चळवळ असल्याचे आणि शांतताप्रिय भक्त असल्याचे कळवावे. चिन्मय कृष्ण दास यांना तात्काळ सोडावे , अशी आमची प्रार्थना आहे.
हेही वाचा-