बीड : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मंगळवारपर्यंत (25 फेब्रुवारी) आरक्षणाचा तिढा सोडवतील, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत," असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलं आहे. त्यामुळं आता मंगळवारपर्यंत हा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे ? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे म्हणाले की, "हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा हे तिन्ही गॅझेट मंगळवारपर्यंत (25 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागू करतील, याची मला खात्री आहे. शिंदे समितीकडं सात महिन्यांपासून गॅजेटचा विषय आहे. त्यामुळं त्याबाबत अभ्यास झाला आहे. १५ दिवसात सगळा अभ्यास होतो," असं जरांगे यांनी म्हटलं. तसंच "देवेंद्र फडणवीस आरक्षण लागू करतील. कारण, सात करोड मराठ्यांचं लक्ष त्यांच्याकडं लागलंय. त्यांनी तातडीनं शब्द दिलेला आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी देखील तीन महिने लागतील," असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं.
धसांना खूप जीव लावला : भाजपा आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीसंदर्भात विचारण्यात आलं असता "सुरेश धसांवर समाजानं खूप प्रेम केलं होतं. तळ हातावरील फोडाप्रमाणं त्यांना सांभाळलं होतं. मात्र, त्यांनी धोका दिला. आता त्यांच्याविषयी बोलण्याची मला इच्छा देखील नाही," असं जरांगे म्हणाले. पुढं ते म्हणाले, "मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाचं अवघड आहे. या प्रकरणातील आरोपी सुटू शकतात. कारण, यंत्रणेला कामच करून दिलं जात नाहीये. तपास यंत्रणेला आरोपी सापडत नाहीत, मोबाईल सापडत नाही, सह आरोपी सापडत नाही, ज्या गाडीत फिरले ती गाडी सापडत नाही."
हेही वाचा -