कानपूर - नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'रात अकेली है पार्ट २' या चित्रपटाचं उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शूटिंग सुरू आहे. या सेटवर अपघात झाल्यानं खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'रात अकेली है भाग २' या चित्रपटाचं शूटिंग कानपूर शहरातील परेड कोतवाली येथे सुरू आहे. नवाजुद्दीन शहरात आल्यामुळे सेटवर मोठा उत्साह आहे. सगळं काही सुरळीत असताना नवाजुद्दीनची गाडी कोतवाली पोलीस ठाण्याच्या भिंतीवर आदळली. या अपघातात कार चालक जखमी झाला, तर नवाजुद्दीन सिद्दीकी थोडक्यात बचावला आहे. या अपघातानंतर शूटिंग मध्येच थांबवावं लागलं. ही घटना शूटिंग सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा घडली.
थोडक्यात बचावला नवाजुद्दीन - मंगळवारी मध्यरात्री १:४५ च्या सुमारास एक दृष्य चित्रीत केलं जात होतं. यादरम्यान, कार ड्रायव्हरनं गाडी पोलीसस्टेशनच्या दिशेनं वेगात वळवली आणि त्याचं स्टीयरिंग व्हील नियंत्रणाबाहेर गेल्यानं कार थेट भिंतीवर आदळली. ही टक्कर इतकी जोरदार होती की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रॉडक्शन युनिटमधील लोकांनी धाव घेतली आणि ड्रायव्हरला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. या अपघातानंतर, शूटिंग ताबडतोब थांबवण्यात आलं आणि बुधवारी कोणतंही शूटिंग झालं नाही. या संपूर्ण प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी जगदीश पांडे म्हणाले, 'पोलीस स्टेशनच्या गेटमधून आत प्रवेश करताना गाडी थोडीशी नियंत्रणाबाहेर गेली, त्यामुळे चालक जखमी झाला, परंतु, काही वेळानं पुन्हा चित्रपटाचे चित्रीकरण झालं.'
कानपूरकरांमध्ये शूटिंगबद्दल प्रचंड उत्साह - 'रात अकेली है भाग २' हा एक मर्डर मिस्ट्रीवर आधारित चित्रपट आहे. रविवारी कानपूरमध्ये त्याच्या शूटिंगला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी चित्रपटाचं शूटिंग मेथोडिस्ट स्कूलमध्ये झालं, तर चित्रपटातील इतर सीन्स सोमवार आणि मंगळवारी कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात शूट करण्यात आले. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेता अखिलेश मिश्रा हे देखील काम करताना दिसत आहेत. कानपूरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यापासून, शहरवासीयांमध्ये खूप उत्साह आहे. नवाजुद्दीन, राधिकाची एक झलक पाहण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनेही हात हलवून त्यांचं स्वागत केलं. कानपूरमध्ये आणखी ५ दिवस शूटिंग सुरू राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. शहरात जाजमौच्या सिद्धनाथ घाटाव्यतिरिक्त, सिसमौसह अनेक ठिकाणी शूटिंग केलं जाईल.
'रात अकेली है' हा एक थ्रिलर ड्रामा चित्रपट २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता त्याच्या सिक्वेलचं शूटिंग सुरू आहे. यासाठी निर्माते कानपूरमधील वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाच्या सिक्वेलचं शूटिंग करत आहेत.
हेही वाचा -
- सिद्धार्थ जाधव - भरत जाधव स्टारर 'आता थांबायचं नाय!'चा टीझर आला समोर, कधी होईल प्रदर्शित जाणून घ्या...
- महाराष्ट्रातलं एक असं गाव ज्यांची आहे स्वतःची फिल्मसिटी, त्यातल्या इरसाल युवकाची सत्यकथा 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'
- 'छावा'ची दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते : टॉलिवूड प्रेक्षकांची साऊथच्या भाषेत चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी, निर्माते घेणार का मोठा निर्णय?