नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता या आज शपथ घेणार आहेत. रेखा गुप्ता यांची बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आज रेखा गुप्ता या दिल्लीतील रामलीला मैदानात आयोजित कार्यक्रमात शपथग्रहण करणार आहेत. त्यांच्यासह अन्य 6 भाजपा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथग्रहण सोहळ्याला अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.
रेखा गुप्ता घेणार आज मुख्यमंत्री पदाची शपथ : भाजपानं दिल्लीत सत्ता संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याची मोठी चर्चा रंगली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची बुधवारी सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता या शपथ घेणार आहेत. रेखा गुप्ता यांच्यासह भाजपाचे सहा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात प्रवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रवींद्र इंद्रराज सिंह, कपिल मिश्रा, डॉ. पंकज सिंह यांचा समावेश आहे.
भाजपानं साधला सामाजिक समतोल : या नवीन मंत्रिमंडळाची स्थापना करताना भाजपानं सामाजिक समतोल आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून परवेश वर्मा यांची निवड केल्यानं भाजपाला जाट आणि गुज्जर समाजाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मनजिंदर सिंग सिरसा शीख समुदायात भाजपाची पकड मजबूत करतील. त्यांच्याबरोबर कपिल मिश्रा आणि आशिष सूद सारख्या नेत्यांच्या सहभागामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, असा अंदाज भाजपाच्या गोटातून लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील हे नवीन मंत्रिमंडळ दिल्लीच्या विकास आणि प्रशासनात नवीन आयाम स्थापित करण्यासाठी काम करेल. भाजपाची ही रणनीती आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र ही टीम दिल्लीकरांच्या अपेक्षा किती पूर्ण करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा :