सातारा - राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळगावी आले आहेत. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. एकनाथ शिंदेंना सलाईन लावण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे. आजारी पडल्यामुळं ते दिवसभर कुणालाही भेटले नाहीत. आमदार दीपक केसरकर हे सुद्धा महाबळेश्वरमधून माघारी गेले.
"एकनाथ शिंदे यांची तब्येत आता ठीक आहे. दोन दिवसांपासून त्यांना ताप, सर्दी होती. सलाईन देखील लावण्यात आलं होतं. आम्ही त्यांना अँटीबायोटिक्स दिले आहेत. 3-4 डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे." - आर.एम. पार्टे, एकनाथ शिंदे यांचे कौटुंबिक डॉक्टर
निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त : एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी दरे गावात दाखल झाले. शनिवारी ते ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांना भेटणार होते. परंतु, ताप आणि कणकण असल्यानं त्यांनी कोणालाही भेटणार नसल्याचं सांगितलं. तसेच ते घराबाहेरही पडलेले नाहीत. घराच्या गेटवर पोलीस बंदोबस्त आहे. तापोळ्यातून लाँचने दरे गावाकडे जाण्यासाठी कार्यकर्ते महाबळेश्वरात येत होते. मात्र, त्याठिकाणी तैनात केलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना दरे गावाकडं जाऊ दिलं नाही, असं काहींनी सांगितलं.
दीपक केसरकर महाबळेश्वरातूनच माघारी फिरले : तब्येत खराब असल्यानं शनिवारी कोणालाही भेटणार नसल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं. परंतु, सकाळपासून सातारा जिल्ह्यातून कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत होते. पोलीस त्यांना निवासस्थानाबाहेर अडवत होते. आमदार दीपक केसरकर हे सुद्धा एकनाथ शिेंदेंना भेटण्यासाठी आले होते. परंतु, त्यांना महाबळेश्वरमधूनच माघारी जावं लागलं.
बंदोबस्तावर मोजके पोलीस : दरे गावात आल्यापासून एकनाथ शिंदे हे कोणालाही भेटलेले नाहीत. माध्यमांशी बोललेले नाहीत. शुक्रवारी रात्री निवासस्थानी मोजक्या १० पोलीस कर्मचाऱ्यांनाच बंदोबस्तावर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच शनिवारी एकनाथ शिंदेंच्या उपचारासाठी आलेली डॉक्टरांची टीम घरात गेल्यानंतर काही वेळातच बाहेर आली, अशी माहिती मिळाली आहे.
हेही वाचा -