पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध पक्ष संघटना तसंच शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त करत शिवप्रेमींची माफी देखील मागितली. आज त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या 'विश्वस्त' पदाचा राजीनामा दिला आहे.
भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा राजीनामा : गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठा सेवा संघाच्यावतीनं भांडारकर इन्स्टिट्यूट येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी 'भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त' पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. तसंच अनेक शिवप्रेमी संघटना, विविध पक्षांच्या वतीनं अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर आंदोलन देखील करण्यात आलं होतं.
"राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर देखील बैठकीत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे राहुल सोलापूरकर यांनी केलेलं वक्तव्य तसंच भूमिकेशी भांडारकर संस्थेचा काहीही संबंध नाही. त्यांनी आता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या 'विश्वस्त' पदाचा राजीनामा दिला असून संस्थेने तो स्वीकारला आहे. - सुधीर वैशंपायन, मानद सचिव, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था
शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य : छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, असं वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात विविध पक्ष संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. असं असताना त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या 'विश्वस्त' पदाचा राजीनामा दिला आहे.
खासदार उदयनराजे भोसले आक्रमक : शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावर छ. शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. "शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडली पाहिजे. दिसेल तिथं ठेचून काढलं पाहिजे.", असा संताप त्यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
हेही वाचा -
- “जीभ हासडली पाहिजे आणि गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावर उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
- "इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण? अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांबद्दलच्या विधानाचा छगन भुजबळांनी घेतला समाचार
- शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त विधानावर राहुल सोलापूरकर यांनी अखेर मागितली माफी