न्यूयॉर्क PM Narendra Modi Visit USA : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा रविवारी (22 सप्टेंबर) दुसरा दिवस होता. त्यांनी रविवारी वॉशिंग्टन कोलिझियम येथे भारतीय नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत हे अमेरिकेतील मराठी नागरिकांनी ढोल-ताशा वाजवून केलं.
भारतीय नागरिकांशी संवाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 'लाँग आयलंड'मधील 'नासाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियम' येथे भारतीय नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूसह देशातील इतर राज्यातील भारतीय नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रीयन नागरिक हे खास आकर्षण होते.
ढोल- ताशाच्या गजरात स्वागत : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. त्यावेळी मोदींनी पारंपरिक वेशभूषा केलेल्या लोकांच्या समुहाला अभिवादन केलं. 'छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...' अशा घोषणा देत आणि ढोल-ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अमेरिकेतील मराठमोळ्या नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत भगवा झेंडा हातात घेतला होता. यावेळी मोदींनी भारतीय नागरिकांशी हस्तांदोलन केलं.
भारतीयांचं योगदान जगानं पाहिलं : न्यूयॉर्कमधील भारतीयांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, "येथे असे म्हटले जाते की त्याग करणाऱ्यांनाच आनंद मिळतो, इतरांचे भले करून आणि त्याग करून आनंद मिळतो, आपण कोणत्याही देशात राहिलो तरी ही भावना बदलत नाही." आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात आपले योगदान अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर, संशोधक, तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही येथे फडकवलेला ध्वज हे त्याचेच प्रतीक आहे, काही काळापूर्वी येथे T-20 क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. यूएसएचा संघ अप्रतिम खेळला, त्या संघात इथे राहणाऱ्या भारतीयांचे योगदान जगाने पाहिले.
समृद्ध भारतासाठी सर्वस्व द्यायचे ठरवलं : भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "तिसऱ्या कार्यकाळात आपल्याला मोठे लक्ष्य गाठायचं आहे. तिप्पट ताकद आणि तिप्पट वेगानं पुढं जायचं आहे. मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला." मरणं हे आपल्या नशिबी नसून जगणं हे आपलं नशीब आहे, असंही ते म्हणाले. "पहिल्या दिवसापासून माझं मन आणि ध्येय खूप स्पष्ट आहे. मी स्वराज्यासाठी जीव देऊ शकलो नाही, पण स्वराज्य आणि समृद्ध भारतासाठी सर्वस्व द्यायचं ठरवलं," असंही मोदी यावेळी म्हणाले.
जो बायडेन यांची घेतली भेट : पंतप्रधान मोदींनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली होती. या भेटीत परस्पर हिताच्या क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांवर तसंच इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. बायडेन यांच्यासोबतची बैठक ही अत्यंत फलदायी असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळवण्यासाठी अमेरिका आग्रही असल्याचं बायडेन यांनी बैठकीत सांगितलं. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत बायडेन यांच्यासह इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांचा समावेश होता. क्वाड समूहात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश आहे.
हेही वाचा
- अडवाणींचा नियम मोदींना का लागू होत नाही? अरविंद केजरीवालांचे मोहन भागवतांना 5 प्रश्न - Arvind Kejriwal on Mohan Bhagwat
- "भाजपाचा सुपडासाफ निश्चित"; सत्यपाल मलिक यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले... - Satya Pal Malik on BJP
- दिल्लीत 'महिलाराज'! आतिशींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; याआधी कोण होत्या महिला मुख्यमंत्री? - Atishi Delhi New CM