वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खंबीर साथ देणाऱ्या टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी यांना निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठं बक्षीस मिळालं आहे. स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क आणि अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी हे अमेरिकेतील नव्या सरकारमध्ये कार्यक्षमतेच्या विभागाची धुरा सांभाळणार आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल एजन्सींमधील नोकरशाहीचं वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशानं टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क आणि मूळ भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. दोन्ही उद्योगपतींसाठी अमेरिकेच्या सरकारमध्ये 'कार्यक्षमता' हा नवीन विभाग (DOGE) करण्यात आला. या विभागाचे दोघांकडे नेतृत्व असणार आहे.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटलं की, "हे दोन अद्भुत अमेरिकन एकत्रितपणे माझ्या प्रशासनामधील (लालफिती) नोकरशाही मोडून काढणे, जास्त झालेले नियमन कमी करणे, अनावश्यक खर्चात कपात करणे आणि फेडरल एजन्सीची पुनर्रचना करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी मदत करतील. 'सेव्ह अमेरिका' चळवळीसाठी हे आवश्यक आहे."
कशासाठी कार्यक्षमता विभाग?ट्रम्प सरकारमध्ये नियुक्ती केल्यानंतर एलॉन मस्क यांनी नेहमीप्रमाणं बेधडक वक्तव्य करणारी पोस्ट केली. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, "एकतर आम्ही कार्यक्षम सरकार चालवू अन्यथा अमेरिका दिवाळखोर होईल. हे चूक असते तर बरे झाले असते. पण ते खरे आहे. आमचे संरक्षण बजेट खूप मोठे आहे. आमचे बजेट एक ट्रिलियन डॉलर्स आहे. आम्हाला कर्जावर भरावे लागणारे व्याज आता संरक्षण बजेटपेक्षा जास्त आहे. हे जास्त काळ टिकणारे नाही. त्यामुळेच आम्हाला सरकारी कार्यक्षमतेचा विभाग हवा आहे."