मुंबई - सुपरस्टार रजनीकांत कुठेही गेला तरी त्याला पाहणे हे चाहत्यांसाठी आणि तमाम प्रेक्षकांसाठी नेहमीच औत्सूक्याचा विषय ठरतो. जर तुम्ही कुठूनतरी प्रवास करत असाल आणि सहप्रवाशी म्हणून जर रजनीकांत असेल तर लोकांची काय अवस्था होऊ शकत असेल याची तुम्ही कल्पना करु शकतात. असाच काहीसा अनुभव आंध्र प्रदेशातील कडप्पाहून चेन्नईला जाणाऱ्या विमान प्रवाशांना आला. या विमानात रजनीकांत चढला आणि त्याने इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला. त्यामुळे सहप्रवाशांमध्ये एक आश्चर्य दिसून आले. या विमानातून प्रवास करणाऱ्या अभिनेता जीवाने रजनीकांतसह सेल्फी घेतला आणि या चकित करणाऱ्या रजनीकांतच्या सहवासातील विमान प्रवासाची गोष्ट इन्स्टाग्रामवरुन सांगितली.
इकॉनॉमीमध्ये उड्डाण करणाऱ्या रजनीकांतचे व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित झाले आहेत. यामध्ये त्याने एअरपॉड्स घातले आहेत आणि त्याच्याशी चाहते संवाद साधताना दिसत आहेत. रजनीकांतच्या सानिध्यात असलेल्या चाहत्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत आहे. रजनीकांतने त्यांच्यासह उड्डाण करून चाहत्यांना आनंदित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2023 मध्येही त्याने 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी सहप्रवाशांसह विमान प्रवास एन्जॉय केला होता.