ठाणे : ठाण्यातील कोपरी परिसरातही बर्ड फ्लूचा शिरकाव (bird flu outbreak in thane) झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढलीय. कोपरी (kopri) परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यामुळं कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून इथली चिकन आणि मटणाची दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण : ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानं खळबळ उडाली. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनानं मोठं पाऊल उचललं आहे. जिल्हा प्रशासनानं सुरक्षेची खबरदारी म्हणून तत्काळ ठाण्यातील या परिसरात बर्ड फ्लूची लागण होऊ नये, म्हणून उपाययोजना आखल्या आहेत.
मांस विक्रेत्यांना स्वच्छतेची समज : पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच 5 एन 1) कंट्रोल मार्गदर्शन तत्वं जारी करण्यात आली आहेत. पॉझिटिव्ह सापडलेल्या पक्षांच्या ठिकाणापासून एक किलोमीटर क्षेत्रात सर्वच चिकन आणि अंडी विक्री दुकानं जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेली आहेत. तसंच मांस विक्री करणाऱ्यांना स्वच्छता बाळगण्याबाबत समज देण्यात आली आहे.
आमचं मोठं नुकसान : "प्रशासनानं अचानक काढलेल्या या आदेशामुळं चिकन विक्रेते मात्र नाराज झाले. एक दोन दिवसांचा कालावधी दिला असता, तर आमचं आर्थिक नुकसान झालं नसतं. चिकन आणलंय, त्यासाठी लागलेला वाहतुकीचा खर्च आणि आता विक्री बंद असल्यामुळं मोठं नुकसान झालं," असं विक्रेत्यांनी सांगितलंय.
हेही वाचा -