मुंबई - अभिनेता विक्रांत मॅसीनं अलीकडेच अभिनयातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. विक्रांतच्या या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटादरम्यान विक्रांतनं अभिनयातून विश्रांती घेण्याची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयाचा वेगळा अर्थ लावण्यात आला. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी काही काळ अभिनयाला विश्रांती देण्याचा तो विचार करत होता. मात्र तो अभिनयातून कायमचा बाजूला जाणार असल्याच्या अफवा पसरल्या. नंतर त्यानं याचा खुलासा करुन आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेल्याचं सांगितलं होतं.
विक्रांत पुन्हा कधीपासून काम करणार या अपडेटकडेसाठी आतुर असलेल्या त्याच्या चाहत्यांना अस्वस्थ वाटत होतं. विक्रांत किती काळ कामापासून दूर राहणार याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. आता विक्रांत शनाया कपूरसोबत डेहराडूनमध्ये शूटिंगवर दिसला आहे. त्यामुळे आपला आवडता स्टार परत आल्यानं विक्रांतचे चाहते आनंदी झाले आहेत. विक्रांत आता शनाया कपूरबरोबर 'आँखों की गुस्ताखियां' या चित्रपटात दिसणार आहे.