बाराबंकी (लखनौ)- रविवारी पहाटे पूर्वांचल एक्सप्रेसवेवर बंद पडलेल्या खासगी बसला ट्रॅव्हलर बसनं पाठीमागून धडक दिली. या अपघातात महाराष्ट्रातून अयोध्येला ट्रॅव्हलरनं जाणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातात ट्रॅव्हलरच्या (मिनी बस) पुढील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी मोठ्या परिश्रमानं गाडीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर त्यानंतर रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आलं.
छत्तीसगडहून अयोध्येला भाविकांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ही बस पूर्वांचल एक्सप्रेस वेवर लोणी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील फुटा भवानीपूर गावाजवळ रस्त्यावर थांबविण्यात आली. पहाटे ५ वाजण्याच्या सुमाराला महाराष्ट्रातील भाविकांना घेऊन मिनीबस अयोध्येला जात होती. अचानक बंद पडलेली खासगी बस समोर दिसताच चालकानं वाहनावरील नियंत्रण गमाविलं. मिनी बस ही खासगी बसला मागून जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, मिनीबसच्या पुढील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर प्रवासी केबिनमध्ये अडकून राहिले. त्यांनी मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आजबाजूच्या लोकांनी गर्दी केली. परिसरातील लोकांनी कळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले.
- गॅस कटरच्या मदतीनं मिनीबसमधून अडकलेले ३ मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आलं. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचार सुरू असताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात एकूण ४ जणांचा मृत्यू झाल्याचं पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितलं.
पाण्याच्या टाकीचे शटरिंग कोसळल्यानं सात जण जखमी- उत्तर प्रदेशातील दुसऱ्या एका घटनेत शनिवारी गाझियाबादच्या मुरादनगर येथील उखलारसी स्मशानभूमीत बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे शटर अचानक कोसळलं. या शटरिंगखाली सुमारे ८ कामगार गाडले गेले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. पोलिसांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या सीएचसीमध्ये नेले. सध्या आठपैकी सात कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. एका कामगाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा-