मुंबई- Vidya Balan exclusive interview : छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळविल्यावर अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी आतुर असतात. परंतु त्यातील फार म्हणजे फारच कमी जणांना मोठ्या पडद्यावर यश मिळाल्याचं दिसतंय. परंतु एक कलाकार छोट्या पडद्यावर फारसं चांगलं काही करायला मिळत नाही म्हणून मोठ्या पडद्यावर अवतरली आणि आता एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिचं नाव घेतलं जातं, ती म्हणजे विद्या बालन! विद्या बालन आजमितीला तिच्या सशक्त भूमिकांसाठी ओळखली जाते. 'हम पांच' सारख्या लोकप्रिय मालिकेतून मनोरंजनसृष्टीत प्रवेशित झालेली विद्या तिच्या भूमिकेला रास्त वाव मिळत नाही म्हणून मालिका सोडून चक्क घरी बसली. परंतु काही काळातच तिने 'परिणीता' मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि नंतर मागे वळून पहिलंच नाही. विद्याच्या नावे एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार, ५ स्क्रीन पुरस्कार असून भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला 'दो और दो प्यार' नामक एक नवीन सिनेमा येऊ घातलाय. त्यानिमित्ताने आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांनी विद्या बालन सोबत वार्तालाप केला त्यातील काही अंश.
याआधी 'दो और दो पांच' नावाचा कॉमेडी सिनेमा येऊन गेलाय. तुमच्या चित्रपटाच्या नावात साधर्म्य आहे. 'दो और दो प्यार' नावाबद्दल काही सांगू शकाल?
'दो और दो चार' होतात. आधीच्या चित्रपटात 'दो और दो पांच' पकडले गेले होते. त्यामुळे 'दो और दो चार की पांच' या कन्फ्युजन वर चित्रपटाचे नाव बेतलेलं आहे. आमच्या चित्रपटात संपूर्ण खेळ 'प्यार' भोवती असल्यामुळे चित्रपटाचे नाव आहे 'दो और दो प्यार'. खरं म्हणजे हा चित्रपट 'लव्हर्स' या आंग्ल भाषिक चित्रपटावरून प्रेरित आहे आणि सुरुवातीला आमच्या या चित्रपटाचे नाव सुद्धा 'लव्हर्स' होते. परंतु हिंदी चित्रपटाला हिंदी नाव जास्त सयुक्तिक वाटेल म्हणून आम्ही चांगल्या हिंदी नावाच्या शोधात होतो. असेच ब्रेन स्टॉर्मिंग करीत असताना मी एक नाव सुचवले आणि विचारले की 'दो और दो प्यार' हे नाव कसे वाटते? अतुल कसबेकर जे निर्माते आहेत त्यांना हे नाव रुचलं आणि ते म्हणाले की, 'हे नाव कथानकाला चपखल बसतंय. बघूया, हे नाव मिळत असेल तर विकत घेऊन टाकू'. कर्मधर्मसंयोगाने ते नाव आम्हाला मिळाले आणि सर्वजण खूष झाले. मला काकणभर जास्तच मस्त आणि अभिमानीत वाटले कारण मी सुचविलेले नाव पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला दिले गेले आहे.
हा हॉलिवूड चित्रपट 'लव्हर्स' चा ऑफिशियल रिमेक आहे. यातील तुमची भूमिका तुम्हालाच समोर ठेऊन लिहिली गेली आहे त्याबद्दल काय सांगाल?
'दो और दो प्यार' हा 'लव्हर्स'चा रिमेक असला तरी आम्ही बरेच बदल केले आहेत. त्यातील मूळ भावनिक गाभा पकडून ठेवत कथानकाला रोमँटिक कॉमेडी सदरात बसवलं आहे. तसेच विषयाचे भारतीयीकरण केलं असून इमोशन्सला विनोदाची फोडणी दिली आहे, जेणेकरून विषय क्लिष्ट न होता प्रेक्षकांना भावेल. आणि हो. या चित्रपटाचे कथानक मला समोर ठेऊन लिहिण्यात आलं आहे. त्याचे झाले असे की स्वाती अय्यर माझ्याकडे आली आणि हा कॉन्सेप्ट ऐकवला. त्यानंतर मला लव्हर्स दाखवला गेला. मला कथानक भावले आणि मी चित्रपट करण्यात रस दाखविला. लेखक सुप्रोतिम सेनगुप्ता यांनी चित्रपटाचे कथानक मला समोर ठेऊन लिहीत असल्याचं सांगितलं. त्यांनी आणि स्वातीने सांगितलं की ते चित्रपट 'लाईट' ठेवणार आहेत, एका रॉम-कॉम' सिनेमाप्रमाणे. मलाही ते खूप भावलं कारण मलाही सध्या काही 'इंटेन्स' करायचं नव्हतं. आणि मला जाणवलं होतं की याचे कथानक 'रॉम-कॉम' च्या वाटेने जाऊ शकते. याचे दिग्दर्शन पुरुषोत्तम गुहा आणि शीर्ष गुहा ठाकुरता यांनी केलं आहे. त्यांनी या चित्रपटाला खूप छान ट्रीटमेंट दिली आहे. त्यांनी चित्रित केलेले प्रसंग एकाचवेळी विनोदी आणि भावनिक वाटतील. मानवी रिलेशन्सबद्दल हा सिनेमा खूप छान बोलतो.