मुंबई - चित्रपटसृष्टी म्हटलं की आपल्या नजरेसमोर मुंबईची गोरेगाव फिल्म सिटी किंवा हैदराबादची रामोजी फिल्म सिटी येते. भारतात विविध भाषेमध्ये चित्रपट बनतात आणि प्रत्येक राज्यात अशी चित्रीकरण करण्यासाठीची स्थळं असतात. मात्र कमी लोकांना माहिती असेल की महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक किंवा कोल्हापूरातच नाही तर मालेगाव या छोट्या शहरातही चित्रपटांची निर्मिती अखंडपणे होत असते. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. मालेगाव ही केवळ हातमागावर काम करणाऱ्या विणकरांची नगरी नाही तर अफाट गुणवत्ता असलेल्या गुणवंतांची चित्रनगरीही आहे. याच शहरातील एका इरसाल युवकाची कथा घेऊन एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे ज्याचं शीर्षक आहे, 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'
या चित्रपटाची कथा मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांना सलाम करणारी आहे. रीमा कागती दिग्दर्शित या चित्रपटात आदर्श गौरव, विनीत कुमार सिंग आणि शशांक अरोरा यांच्या दमदार भूमिका आहेत. अनेक चित्रपट महोत्सवांमधून त्यांचं कौतुक झालंय. आता त्यांना थेट प्रेक्षकांमध्ये आपलं स्थान निर्माण करायचंय. या चित्रपटाची कथा नासिर शेख आणि त्याच्या मित्रांची सत्यकथा आहे. मालेगाव या छोट्या शहरातील ही चित्र निर्मितीचा ध्यास घेतलेली मुलं आपल्यातील सर्जनशीलतेने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करतात. भारतीय चित्रपटाच्या गौरवशाली परंपरेत योगदान देणाऱ्या तरुणाईची ओळख संपूर्ण देशाला यानिमित्तानं होणार आहे.
रीमा कागतीचा हा आगामी सिनेमा एक अनोखी कथा कथन करतो. यामध्ये अगदी सामान्य असणाऱ्या खऱ्याखुऱ्या पात्रांचे अनुभव मोठ्या पडद्यावर अतिशय सिनेमॅटिक पद्धतीनं सादर केलं जातात. हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित आहे आणि प्रेक्षकांना एक अनोखा नाट्यमय अनुभव देणारा आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना अलीकडेच निर्मात्या झोया अख्तरनंही चित्रपटासाठी हीच कथा का निवडली त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. याबद्दल बोलताना तिनं सांगितलं होतं की, या चित्रपटाचा नायक असलेला नासिर हा स्वतः एक चित्रपट बनवणारा व्यक्ती आहे. कोणतीही तांत्रीक साधन नसताना त्यानं थक्क करणारी चित्रपट निर्मिती केली. इतक्या कमी साधनं असतानाही सिनेमा बनू शकतो याचं अचाट उदाहरण त्यानं दाखवून दिलं. यामागं त्याचं चित्रनिर्मितीवर असलेलं प्रेम, त्यासाठीचा ध्यास, मित्रांनी केलेली मदत आणि जीव ओतून महेनत करण्याची तयारी, यामुळं त्यानं आपलं सिनेमा बनवण्याचं स्वप्न लीलया साकारलं. विणकरांचं गाव असलेल्या मालेगावला नासिरनं एक वेगळी ओळख दिली. ही गोष्ट आज अनेकांसाठी खूपच प्ररणा देणारी आहे.
'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' म्हणजे एक सिनेमा नाही तर तो एक मनाला चटका देणारा भावनिक प्रवास आहे. यातली पात्रं साधी परंतु सर्जनशील आहेत. त्यांनी मालेगावात सुरू केलेल्या चित्रपट निर्मितीच्या नव्या संस्कृतीचा, त्यांच्या स्वप्नांचा, संघर्षांचा आणि चित्रपटाप्रती असलेल्या त्यांच्या अढळ समर्पणाचा हा चित्रपट छान मागोवा घेतो. याशिवाय या चित्रपटाची कथा छोट्या शहरातील चित्रपट निर्मात्यांना येणाऱ्या अडचणींवर देखील प्रकाश टाकणारी आहे. चित्रपट निर्मिती करताना येणाऱ्या अनंत अडणींवर हे तरुण कशी मात करतात, चित्रपट बनवण्याची त्यांची आवड कशी जपतात आणि निराशेला थारा न देता स्वप्नं कशी साध्य करतात याचा थरारक अनुभव हा चित्रपट देणार आहे.
'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर, झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी केली आहे. वरुण ग्रोव्हर लिखित हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी भारतासह जगभर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
- 'छावा'ची दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते : टॉलिवूड प्रेक्षकांची साऊथच्या भाषेत चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी, निर्माते घेणार का मोठा निर्णय?
- ऋषभ शेट्टी स्टारर 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज'चा फर्स्ट लूक प्रदर्शित...
- शिवरायांच्या देदीप्यमान जीवनचरित्रावर चित्रपटांची फक्त घोषणा... दिग्गज दिग्दर्शक 'आरंभशूर' आहेत का?