मुंबई - अभिनेता विकी कौशलला दररोज आपला वेळ व्यायामासाठी देत असतो. शरीर फिट राहण्यासाठी तो पुरेपुर काळजी घेतो. अलिकडे इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यानं पोस्ट केलेला एक व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहे. अलिकडेच 'छावा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. यामध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याच्या हातावर आता बँडेज करण्यात आलंय. असे असतानाही त्यानं आपल्या वर्कआउटचा वेळ वाया घालवला नाही. जखमी असूनही तो जिममध्ये घाम गाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं त्याच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
"जेव्हा आपण धावू शकत नाही तेव्हा आपण चालतो...आपण थांबू शकत नाही", असं कॅप्शन त्यानं आपल्या व्हिडिओला दिलंय. तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाचं शूटिंग करतोय. ऐतिहासिक विषयावरील या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत. या चित्रपटात रश्मिका मंदान्नाही भूमिका साकारणार आहे.
रश्मिकाने नुकतेच 'छावा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. शूट संपल्यानंतर तिने दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रपटाच्या इतर टीमचे आभार मानले. या चित्रपटात विकी कौशलसह ती पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करत आहे. विकीबद्दल काम करत असतानाचा अनुभव शेअर करताना रश्मिकानं लिहिलंय, "तुझ्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. तू खूपच प्रेमळ आहेस. मी गंमत करतेय.. तू एक रत्न आहेस. तुझ्यासाठी मी नेहमी शुभेच्छा देईन. खूप आनंद झाला. आईने मला तुला नमस्कार करायला सांगितले आहे."