मुंबई -90च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर आज 4 फेब्रुवारी रोजी आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. आज 'रंगीला गर्ल' चित्रपटसृष्टीपासून दूर आहे, मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिनं बॉलिवूडमध्ये 90च्या दशकात रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शक आणि निर्माते तिच्याबरोबर काम करण्यासाठी खूप उत्सुक असायचे. उर्मिलानं बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 3 वर्षांची असताना तिनं 1977मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्मा' चित्रपटात काम केलं. तसेच मुख्य अभिनेत्री म्हणून तिनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात मल्याळम चित्रपट 'चाणक्यन' मधून केली.
उर्मिला मातोंडकरचा चित्रपटसृष्टीतील प्रवास : 1974मध्ये मुंबईत जन्मलेली मातोंडकरचा पहिला हिंदी चित्रपट 'नरसिम्हा' होता, हा चित्रपट 1991मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर सनी देओल मुख्य भूमिकेत दिसला होता. दरम्यान 1995 मध्ये रिलीज झालेला राम गोपाल वर्माच्या 'रंगीला' चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अभिनेता आमिर खान दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटामधील गाणी देखील हिट झाली होती. उर्मिलाला 'रंगीला' चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उर्मिलानं तिच्या चित्रपट कारकिर्दीत राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर 13 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान असं म्हटलं जातं होतं की, राम गोपाल विवाहित असूनही उर्मिला त्यांच्यावर प्रेम करत होती. या दोघांच्या अफेयरबद्दल चर्चा चित्रपटसृष्टीत होती. उर्मिलाला राम गोपाल वर्मा खूप आवडाचे, त्यामुळे तिनं बाकी दिग्दर्शकांबरोबर काम करण्यास नकार दिला होता. तसेच राम गोपाल वर्मा तिला प्रत्येक चित्रपटांमध्ये कास्ट करत होते.